राज्यातील एसटी बसस्थानकांवर उभारणार ही सुविधा... टोयोटा किर्लोस्कर कंपनीचा पुढाकार...

Share:
Main Image
Last updated: 18-Sep-2026

अक्षय काळे, (मुंबई) १६ सप्टेंबर - महाराष्ट्रातील महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एसटी बसस्थानकांवर स्तनदा मातांना आपल्या बाळांची निगा राखण्यासाठी व स्तनपानासाठी स्वच्छ आणि खासगी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत याबाबतचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

टोयोटा किर्लोस्करच्या 'सीएसआर' निधीतून उभारणी

पूर्णपणे मोफत सुविधा: या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाला कोणताही आर्थिक भार उचलावा लागणार नाही. टोयोटा किर्लोस्कर कंपनी आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून ही सुविधा उभारणार आहे.

आधुनिक सोयी-सुविधा: अंदाजे ३ मीटर × ३ मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड (Pre-fabricated) कक्ष तयार केले जातील. यामध्ये आवश्यक फर्निचर, फिक्स्चर, अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण व इलेक्ट्रॉनिक साहित्याचा समावेश असेल.

३ वर्षांचे टप्प्याटप्प्याने नियोजन

आगामी तीन आर्थिक वर्षांत एकूण १२५ कक्ष उभारले जातील:

Advertisement

२०२६-२७: ५० कक्ष

२०२७-२८: ५० कक्ष

२०२८-२९: २५ कक्ष

एसटी महामंडळाची जबाबदारी

एसटी महामंडळाकडून या कक्षांसाठी ५ मीटर × ५ मीटरची जागा, वीज आणि पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल. हस्तांतरण झाल्यानंतर या कक्षांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी एसटी प्रशासनाची असणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, हा प्रकल्प म्हणजे मातृत्वाचा सन्मान आणि महिला प्रवाशांच्या गरजांप्रती दाखवलेली संवेदनशीलता असल्याचे नमूद केले.

?s=20

Comments

No comments yet.