अक्षय काळे, (मुंबई) १५ सप्टेंबर
रायगड जिल्ह्यातील दिघी येथे जागतिक दर्जाचा 'ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह' (Greenfield Shipbuilding Industrial Cluster) उभारण्यासाठी आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड' (NSHIPML) आणि 'माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड' (MDL) यांच्यात सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पामुळे राज्यात तब्बल ९० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
९० हजार रोजगार अन् १५ हजार कोटींची गुंतवणूक:
या सामंजस्य करारांतर्गत माझगाव डॉकद्वारे (MDL) दिघी येथे सुमारे १५ हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक केली जाणार आहे. या केंद्रात प्रतिवर्ष किमान १.२ दशलक्ष सकल टनभार (Gross Tonnage) एवढ्या अवाढव्य जहाजबांधणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे भारताला मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणे सुलभ होणार असून सागरी औद्योगिक क्षमतेला मोठी बळकटी मिळणार आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:
'मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७'ला बळ: केंद्र सरकारच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्याचा हा एक भाग असून, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे 'एनशिपएमएल'ची स्थापना केली आहे.
आधुनिक पुरवठा साखळी विकसित होणार: दिघी येथे केवळ जहाजांची बांधणीच होणार नाही, तर त्यास पूरक असणारी औद्योगिक परिसंस्था आणि अत्याधुनिक पुरवठा साखळी (Supply Chain System) देखील विकसित केली जाईल.
जागतिक स्तरावर भारताची पत वाढणार: देशांतर्गत तंत्रज्ञान, कुशल रोजगार आणि परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करून जागतिक सागरी क्षेत्रात भारताची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.
दिग्गजांची उपस्थिती:
या करारप्रसंगी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. करारावर एमडीएलतर्फे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन आणि एनशिपएमएलतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
एमडीएलचे अध्यक्ष कॅप्टन जगमोहन यांनी या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.