अक्षय काळे, (मुंबई) १५ सप्टेंबर - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे बुधवार, १६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या एकदिवसीय धार्मिक आणि आध्यात्मिक दौऱ्यावर येत आहेत. गणेशोत्सवाच्या या पावन प्रसंगी ते मुंबई आणि पुण्यातील विविध प्रमुख गणेशोत्सव मंडळे आणि प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊन विघ्नहर्त्या श्री गणेशाचे दर्शन व पूजन करणार आहेत.
मुंबईतील भरगच्च कार्यक्रम:
नितीन नबीन यांचे सकाळी १०:२० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरून ते थेट ऐतिहासिक श्री सिद्धिविनायक मंदिराकडे रवाना होऊन विधीवत पूजा करतील. त्यानंतर सकाळी ११:३० वाजता ते प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी उपस्थित राहतील.
दुपारी १२:०० वाजता मलबार हिल येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गणपती दर्शनासाठी ते भेट देतील. त्यानंतर मलबार हिलवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतील. दुपारी २:१५ वाजता वांद्रे रिक्लेमेशन येथील श्री गणेशाचे दर्शन घेऊन ते पुण्याकडे प्रस्थान करतील.
पुण्यातील श्री गणेश दर्शन दौरा:
पुण्यात आगमन झाल्यानंतर नबीन हे सर्वप्रथम ग्रामदैवत 'कसबा गणपती'चे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी ५:०० वाजता जगप्रसिद्ध 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती'च्या चरणी लीन होतील.
सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दौऱ्याच्या शेवटी, सायंकाळी ५:३० वाजता ते सदाशिव पेठेतील 'साने गुरुजी तरुण मित्र मंडळ' आणि त्यानंतर कोथरूड येथील 'श्री साई मित्र मंडळा'च्या श्री गणेशाचे दर्शन व पूजन करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ते देश व राज्यातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करणार आहेत.