नाशिक, (प्रतिनिधी) १८ जानेवारी - नाशिकची रहिवासी जयवर्धिनी अभिमन्यू राठोड यंदा नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर होणाऱ्या ७७ व्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणार आहे. यापूर्वी तिचीच बहीण दुर्गेश नंदिनीला दोन वेळा सॅक्सोफोन वाजविण्याची संधी मिळाली होती.
नाशिकच्या (विस्टा) इंदिरा नगर स्थित जयवर्धिनी अभिमन्यू राठोड हिची राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सदस्य म्हणून प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्यासाठी निवड झाली आहे. जयवर्धिनीचे पालक खासगी उद्योग समुहात उच्चपदस्थ अधिकारी आहेत. ती संचलना दरम्यान तिच्या शाळेच्या बँडचा भाग म्हणून क्लॅरिनेट (मोठी बासरी) वाजवणार आहे.
जयवर्धिनी ही नाशिकच्या फ्रावशी अकादमीची माजी विद्यार्थिनी आहे. कोविड काळानंतर ती मूळ गावी शालेय शिक्षणासाठी राजस्थान मधील पिलानी येथे गेली, जिथे ती एनसीसीमध्ये सक्रियपणे सामील झाली.
ती सध्या शिक्षणासाठी एक नामांकित आणि प्रतिष्ठित संस्था असलेल्या पिलानी येथील बिर्ला बालिका विद्यापीठात नवव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे.
नाशिकच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात तिची या संचलनातील निवड अत्यंत अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया आहे.