महिनाभराच्या लढ्याला यश... CET निकालाचे फॉरेन्सिक ऑडिट होणार...

Share:
Main Image
Last updated: 14-Sep-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ सप्टेंबर - गेल्या महिनाभरापासून MHT-CET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, निकालातील तफावत आणि विद्यार्थ्यांच्या अत्यंत गोपनीय डेटा लीक प्रकरणी सुरू असलेल्या तीव्र संघर्षाला अखेर यश येताना दिसत आहे. याप्रकरणी सातत्याने आवाज उठवणाऱ्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी CET निकालाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे तसेच डेटा लीक प्रकरणात FIR दाखल करण्याचे स्पष्ट आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

विद्यार्थ्यांच्या डेटा लीक प्रकरणात यापूर्वी तब्बल चार ते पाच तास पोलीस ठाण्यात बसूनही पोलिसांनी FIR दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती. परंतु, आज झालेल्या बैठकीत या गंभीर बाबीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पोलीस कारवाई करण्याचे निर्देश देण्याचा शब्द दिला आहे.

EduSpark चे फॉरेन्सिक ऑडिट; पण 'कार्टेल'चे काय?

मुख्यमंत्र्यांनी CET निकालांचे ऑडिट करताना संबंधित 'EduSpark' या कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे मान्य केले आहे. मात्र, या निर्णयामुळे पूर्ण समाधान झालेले नाही. EduSpark कंपनीने CET टेंडर प्रक्रियेत केलेल्या कथित 'कार्टेल' (Cartelisation) संदर्भात आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतेही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही.

Advertisement

तसेच, भविष्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आगामी CET परीक्षा पारदर्शक पद्धतीने आणि 'ऑफलाइन' स्वरूपात घेण्याबाबतही शासनाने कोणतीही ठोस भूमिका मांडलेली नाही, याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले आहे.

सरकारला भाग पाडू; दोन-तीन दिवसांत अंमलबजावणीची मागणी

विष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "EduSpark वर कारवाई करायला आणि आगामी CET परीक्षा ऑफलाइन घ्यायला आम्ही सरकारला येत्या काळात भाग पाडूच. पण आज दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पुढील दोन ते तीन दिवसांत निकालाचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू करणे आणि डेटा लीक प्रकरणात FIR नोंदवणे, या दोन्ही मागण्यांवर तात्काळ आणि आवश्यक ती अधिकृत कार्यवाही करावी."

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या लढ्याला मिळालेले हे आश्वासन म्हणजे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने पहिले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष कारवाई आणि शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे आता लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.