असा आजार तुम्ही कधी ऐकलाय का? ५ वर्षे कानात धडधडत होते 'हृदयाचे ठोके'... जळगावच्या तरुणीला असे मिळाले नवजीवन...

Share:
Main Image
Last updated: 14-Sep-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ सप्टेंबर - गेल्या ५ वर्षांहून अधिक काळापासून कानात हृदयाच्या ठोक्यांसारखा सतत "व्हूशिंग" आवाज येण्याच्या अत्यंत दुर्मिळ व त्रासदायक आजाराने त्रस्त असलेल्या जळगाव येथील २५ वर्षीय महिलेला मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे नवजीवन मिळाले आहे. डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या मिनिमली इनव्हेसिव्ह (कमी चिरफाड असणाऱ्या) शस्त्रक्रियेनंतर या महिलेचा त्रास तात्काळ पूर्णपणे बरा झाला आहे.

नक्की काय होता आजार आणि कसा शोधला मार्ग?

रुग्ण महिलेला कानात सतत हृदयाच्या ठोक्यांच्या लयीत आवाज येत होता. अनेक वर्षे विविध चाचण्या व उपचार करूनही मूळ कारण समजू शकले नव्हते. अखेर जसलोक हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. फाली पोन्चा, एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. सुधीर आंबेकर आणि हेमॅटोलॉजिस्ट डॉ. समीर शाह यांच्या तज्ज्ञ पथकाने रुग्णाची MRI आणि MRV तपासणी केली.

तपासणीत मेंदूतील मुख्य रक्तवाहिनी अरुंद झाल्याचे (व्हेनस सायनस स्टेनोसिस) निदान झाले. या अरुंद वाहिनीमुळे रक्ताच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन कानात हृदयाच्या ठोक्यांसारखा आवाज येत होता. या आजाराला वैद्यकीय भाषेत 'पल्साटाईल टिनिटस' (Pulsatile Tinnitus) म्हटले जाते.

'मिनिमली इनव्हेसिव्ह' स्टेंटिंगद्वारे यशस्वी उपचार

Advertisement

निदानानंतर डॉक्टरांनी रुग्णावर 'मिनिमली इनव्हेसिव्ह व्हेनस सायनस स्टेंटिंग' ही अत्याधुनिक प्रक्रिया केली. यामध्ये मांडीतील शिरेद्वारे कॅथेटर मेंदूपर्यंत नेऊन अरुंद रक्तवाहिनीत स्टेंट बसवण्यात आला आणि रक्ताचा मार्ग मोकळा करण्यात आला. स्टेंट बसवताच रुग्णाचा ५ वर्षांपासूनचा त्रास त्वरित बंद झाला आणि तिला अवघ्या दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला.

तज्ज्ञ डॉक्टरांचे मत:

डॉ. सुधीर आंबेकर (एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन): "या आजाराचे अनेकदा चुकीचे निदान केले जाते किंवा मानसिक ताण समजून दुर्लक्ष केले जाते. परंतु, योग्य वेळेत निदान आणि आधुनिक कॅथेटर-स्टेंटिंग तंत्रज्ञानामुळे रुग्ण अवघ्या दोन दिवसांत बरा होऊन घरी जाऊ शकला."

डॉ. फाली पोन्चा (न्यूरोलॉजिस्ट): "टिनिटसच्या एकंदरीत रुग्णांमध्ये 'पल्साटाईल टिनिटस'चे प्रमाण १०% पेक्षा कमी आहे. कानात सतत येणाऱ्या अशा आवाजांकडे दुर्लक्ष न करता सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. उपचारायोग्य कारण असल्यास रुग्णाला नक्कीच पूर्ण आराम मिळू शकतो."

जितेंद्र हरियाण (सीईओ, जसलोक हॉस्पिटल): "अनेक वर्षांच्या त्रासानंतर रुग्ण पूर्णपणे लक्षणमुक्त होणे अत्यंत समाधानाची बाब आहे. गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ आजारांवर प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वोत्तम उपचार देणे हेच आमचे ध्येय आहे."

Comments

No comments yet.