अक्षय काळे, (मुंबई) १४ सप्टेंबर - महाराष्ट्राची जीवन वाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (MSRTC) ताफा अधिक सक्षम, आधुनिक आणि आरामदायी करण्यासाठी ५ हजार नव्या 'लालपरी' बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निविदेत 'टाटा मोटर्स' या नामांकित कंपनीने सर्वांत कमी दराचा देकार सादर केला असून, बसेसच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
नव्या बसेसमुळे प्रवाशांना मिळणारे फायदे व महत्त्वाचे मुद्दे:
जुण्या व गळक्या बसेसपासून मुक्ती: पुढील सहा महिन्यांत ताफ्यातील सुमारे ५ हजारांहून अधिक जुन्या बसेस कालबाह्य (Scrap) होणार आहेत. नव्या बसेस दाखल झाल्याने जुन्या बसेसवरील ताण कमी होईल आणि प्रवासादरम्यान बस बंद पडण्याच्या किंवा गळण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करता येईल.
‘मागेल त्याला बसफेरी’ धोरण: नव्या बसेस उपलब्ध झाल्यानंतर मागणीनुसार 'मागेल त्याला बसफेरी' देण्याचा महामंडळाचा प्रयत्न राहील. मात्र, या फेऱ्या तोट्यात चालणार नाहीत, याची हमी स्थानिक प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले आहे.
ताफ्याचे आधुनिकीकरण: यापूर्वीच २ बाय २ आसन व्यवस्थेच्या २,६४० 'लालपरी' बसेस ताफ्यात आल्या आहेत. याशिवाय ३ बाय २ आसन व्यवस्थेच्या ३,००० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल करण्याची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे.
ई-बसेसच्या युगाची सुरुवात: ५ हजार डिझेल बसेसचा हा टप्पा पारंपरिक डिझेल बसेसच्या खरेदीचा शेवटचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यानंतर एसटी महामंडळ पूर्णपणे पर्यावरणपूरक ई-बसेस (Electric Buses) खरेदीवर भर देणार आहे.
ग्रामीण महाराष्ट्रातील लाखो नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, वेळेवर आणि दर्जेदार करण्यासाठी एसटी आता नव्या दमाने आणि नव्या तंत्रज्ञानासह सज्ज होत असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.