अक्षय काळे, (मुंबई) १३ सप्टेंबर - महाराष्ट्रातील दुग्धव्यवसाय आणि पशुपालन क्षेत्र सध्या एका ऐतिहासिक परिवर्तनाच्या टप्प्यावर उभे आहे. हजारो वर्षांची पारंपरिक पशुपालनाची पद्धत आता प्रयोगशाळेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडली जात असून, राज्यात एका नव्या ‘श्वेतक्रांती’चा उदय होत आहे. लिंग निश्चित वीर्यमात्रा (Sex Sorted Semen - SSS) आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान (Embryo Transfer Technology - ETT/IVF) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे राज्यातील पशुधनाची आनुवंशिक गुणवत्ता, दूध उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत आहे.
अनुभवातून निवडीपासून ते विज्ञानातून निवडीपर्यंत
सिंधू संस्कृतीच्या काळापासून चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीत पशुपालक आपल्या अनुभवावरून आणि निरीक्षणावरून चांगल्या जनावरांची निवड करत असत. मात्र, आता विज्ञानाच्या मदतीने जनावरांच्या आनुवंशिक गुणवत्तेचा अभ्यास करून पुढील पिढी कशी असावी, हे ठरवले जात आहे.
ETT/IVF: पशुपालनातील 'टेस्ट ट्यूब बेबी'
* एका गाईपासून ४० ते ५० वासरे: नैसर्गिक पद्धतीत एका गाईपासून वर्षाला एकच वासरू मिळते. मात्र, भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानामुळे एकाच उच्च गुणवत्तेच्या 'दाता गाई'पासून वर्षाला ४० ते ५० उच्च दर्जाची वासरे मिळवणे शक्य झाले आहे.
* गोशाळेतील कमी उत्पादनक्षम गायही होणार 'सरोगेट मदर': कमी दूध देणाऱ्या किंवा स्थानिक गाई-म्हशींचा वापर 'प्राप्तकर्ता' (Recipient) म्हणून करून त्यांच्या गर्भाशयात उच्च गुणवत्तेचा भ्रूण प्रत्यारोपित केला जातो. यामुळे कमी उत्पादनक्षम जनावरांच्या माध्यमातूनही उत्तम वंशावळीची वासरे जन्माला येत आहेत.
'नर की मादी?' आता ९०% पेक्षा जास्त मादी कालवडींच्या जन्माची हमी
पारंपरिक पद्धतीत नर की मादी वासरू जन्मणार, याची शक्यता ५०:५० असते. मात्र, 'सेक्स सॉर्टेड सिमेन' (SSS) तंत्रज्ञानामुळे मादी वासरू (कालवड) जन्मण्याची शक्यता ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे. यामुळे दूध उत्पादनासाठी उपयुक्त कालवडींची संख्या वाढेल आणि नर वासरांच्या संगोपनावरील अनावश्यक खर्चात बचत होईल.
महाराष्ट्राची प्रयोगशाळेतून श्वेतक्रांतीकडे दमदार घोडदौड
राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होत आहे:
* १४,६९८ भ्रूण प्रत्यारोपण: राज्यात डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत १४,६९८ भ्रूण प्रत्यारोपित करण्यात आले असून त्यातून २,४७३ उच्च गुणवत्तेच्या वासरांचा जन्म झाला आहे.
* ताथवडे प्रयोगशाळेचा विक्रम: पुण्यातील ताथवडे येथील प्रयोगशाळेतून जुलै २०२६ पर्यंत ६३ वासरांचा जन्म झाला आहे.
* 'शीतल'चा ऐतिहासिक जन्म: २३ जुलै २०२२ रोजी ताथवडे प्रयोगशाळेत 'शीतल' या देशातील पहिल्या पंढरपुरी म्हशीच्या बछडीचा भ्रूण प्रत्यारोपणातून जन्म झाला, तर मुऱ्हा म्हशीमध्ये एकाच स्त्रीबीज संकलनातून ४ रेडकांचा जन्म झाला आहे.
* स्थानिक वंशाचे संवर्धन: गिर, साहिवालसोबतच महाराष्ट्रातील खिलार, डांगी, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ या गोवंशाचे तसेच नागपुरी, मराठवाडी आणि पंढरपुरी म्हशींचे संवर्धन यातून केले जात आहे.
महागडे तंत्रज्ञान आता थेट सामान्य पशुपालकांच्या गोठ्यात!
अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने मोठी सबसिडी उपलब्ध करून दिली आहे:
* ८१ रुपयांत वीर्यमात्रा: मूळ किंमत रु. १,२०० ते १,५०० असणारी 'सेक्स सॉर्टेड वीर्यमात्रा' केंद्र व राज्य शासनाचे अनुदान आणि MahaLDB च्या मदतीने पशुपालकांना अवघ्या ८१ रुपयांत उपलब्ध करून दिली जात आहे. आतापर्यंत ३.६६ लाख वीर्यमात्रांचे वितरण झाले आहे.
* १०,००० रुपये प्रोत्साहनपर रक्कम: गोशाळा किंवा सामान्य पशुपालकांच्या गोठ्यात भ्रूण प्रत्यारोपणातून निरोगी वासरू जन्माला आल्यास शासनाकडून १० हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जात आहे.
* १००% अनुदान: 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने'अंतर्गत पात्र पशुपालकांना ETT आणि SSS तंत्रज्ञान १००% अनुदानावर मोफत दिले जात आहे.
प्रत्येक महसुली विभागात उभारल्या जाणार प्रयोगशाळा
हे तंत्रज्ञान राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रत्येक महसुली विभागात प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. पुण्याच्या ताथवडे व्यतिरिक्त पेण (मुंबई), हेटीकुंडी (नागपूर), हरसूल (छत्रपती संभाजीनगर), लोणी बुद्रुक (नाशिक) आणि अकोला (अमरावती) येथे नवीन प्रयोगशाळा उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
"महाराष्ट्रातील श्वेतक्रांतीचा पुढील टप्पा केवळ जनावरांची संख्या वाढवण्यात नसून; उत्तम अनुवंशिक गुणवत्ता, अधिक दूध उत्पादन, निरोगी पशुधन, कमी खर्च आणि शेतकऱ्यांचे वाढते उत्पन्न यात आहे. पारंपारिक अनुभवाला विज्ञानाची साथ देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट केली जात आहे."
— पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन