ही लक्षणे दिसताय? जराही दुर्लक्ष करू नका.. येऊ शकतो हार्ट अटॅक...

Share:
Main Image
Last updated: 12-Oct-2026

केशव खेडकर, (नाशिक) १२ ऑक्टोबर - बदलती जीवनशैली, वाढता मानसिक ताण, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान यांसारख्या घटकांमुळे हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेला ‘STEMI’ (ST-Elevation Myocardial Infarction) उपक्रम ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षभरात १ लाख २६ हजारांहून अधिक नागरिकांची ईसीजी तपासणी करण्यात आली आहे.

क्लाऊड तंत्रज्ञानामुळे अवघ्या काही मिनिटांत निदान

‘STEMI’ उपक्रमाअंतर्गत छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे, चक्कर येणे किंवा हात, मान व जबड्यात वेदना होणे अशी लक्षणे दिसताच रुग्णाची जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत तातडीने ईसीजी तपासणी केली जाते. हा ईसीजी क्लाऊड आधारित तंत्रज्ञानाद्वारे त्वरित तज्ज्ञ हृदयरोग चिकित्सकांकडे पाठवला जातो. अवघ्या काही मिनिटांत ईसीजीचे विश्लेषण करून रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आहे का आणि त्याची तीव्रता किती आहे, याबाबतचे वैद्यकीय मार्गदर्शन तातडीने स्थानिक डॉक्टरांना मिळते. यामुळे प्राथमिक निदानासाठी रुग्णाला मोठ्या शहरात नेण्याचा वेळ वाचत असून, स्थानिक पातळीवरच तातडीचे उपचार सुरू करणे शक्य होत आहे.

पुढील उपचारांसाठी सुलभ संदर्भ सेवा

प्राथमिक निदानानंतर वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार तातडीने उपचार सुरू केले जातात. ज्या रुग्णांना उच्चस्तरीय उपचारांची आवश्यकता असते, त्यांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी अथवा बायपास शस्त्रक्रियेसाठी तात्काळ सक्षम रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाते. पात्र रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत मोफत अथवा सवलतीच्या दरात हे उपचार उपलब्ध करून दिले जातात. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांपर्यंत या सुविधेचा विस्तार करण्यात आला आहे.

"हृदयविकाराच्या झटक्यात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. लक्षणे दिसताच घरगुती उपचार किंवा दुर्लक्ष न करता नागरिकांनी तातडीने ईसीजी तपासणी करून घ्यावी आणि वेळेत उपचार मिळवावेत."

— डॉ. राजेंद्र बागुल, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

Advertisement

ही लक्षणे दिसल्यास त्वरित ईसीजी करा:

छातीत तीव्र वेदना किंवा दडपण जाणवणे

वेदना डाव्या हातात, मान, खांदा किंवा जबड्याकडे पसरणे

अचानक श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे

खूप घाम येणे, चक्कर किंवा अस्वस्थता जाणवणे

मळमळणे अथवा उलटी होणे

आपत्कालीन आरोग्य मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन: १०४

Comments

No comments yet.