दुभंगलेले ओठ अन् टाळू असलेली बालके... या १५ हॉस्पिटलमध्ये होणार मोफत उपचार... फडणवीस यांची मोठी घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 13-Sep-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १३ सप्टेंबर - जन्मजात दुभंगलेले ओठ आणि टाळू (Cleft Lip and Palate) या विकाराने ग्रस्त असलेल्या राज्यातील बालकांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आता अशा बालकांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहेत. यासाठी ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र’, ‘बजाज फायनान्स’ आणि ‘स्माईल ट्रेन इंडिया’ या संस्थांमध्ये तीन वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

उपचारासोबत राहणे, खाणे अन् प्रवासही मोफत!

या उपक्रमांतर्गत केवळ शस्त्रक्रियाच नव्हे, तर रुग्णाचा संपूर्ण खर्च उचलला जाणार आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल:

बालकांवर होणारी शस्त्रक्रिया (Surgery) आणि औषधोपचार.

रुग्णालयातील वास्तव्य, भोजन आणि पोषणविषयक सेवा.

दंतव्यंगोपचार (Orthodontics) आणि वाचा उपचार (Speech Therapy).

शस्त्रक्रियापूर्व तपासण्या आणि शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतीवरील उपचार.

विशेष सोय: रुग्ण आणि पालकांसाठी प्रवासाची सुविधा तसेच प्रवासाचा खर्चही ‘स्माईल ट्रेन इंडिया’कडून केला जाणार आहे.

आरबीआय आणि आरबीएसके पथकांद्वारे शोध

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) आरोग्य पथके, शाळा व अंगणवाड्यांमध्ये तपासणी करून अशा बालकांची ओळख पटवतील. जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या शिफारसपत्रानंतर बालकांना स्माईल ट्रेनच्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवले जाईल. बालकांची ओळख पटवण्यासाठी राज्यभर विशेष तपासणी शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत.

राज्यातील 'या' १५ मान्यताप्राप्त रुग्णालयांत होणार उपचार:

नाशिक: वेदांत हॉस्पिटल प्रा. लि.

पुणे: पूना हॉस्पिटल

Advertisement

मुंबई: मीरा एनएक्स हॉस्पिटल / शुश्रूषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल

ठाणे: एमआरआर चिल्ड्रन्स हॉस्पिटल

छत्रपती संभाजीनगर: बेंबडे हॉस्पिटल

नागपूर: स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल

वर्धा: आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय

अहिल्यानगर: आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर

जळगाव: आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल

सोलापूर: एलिट कॉस्मो क्लिनिक अँड प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल

लातूर: लहाने हॉस्पिटल

अकोला: श्रीराम हॉस्पिटल

गोंदिया: सहयोग हॉस्पिटल

कोल्हापूर: वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस (विन्स)

मदत व अधिक माहितीसाठी हेल्पलाइन

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांच्या उपचारांसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी किंवा नोंदणीसाठी १८०० १०३ ८३०१ (18001038301) या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.