मुंबई, (प्रतिनिधी) १३ सप्टेंबर - रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत सन २०२६ ते २०२९ या कालावधीत राज्यभरात मद्य व अंमली पदार्थ (ड्रग्स) तपासणीचे व्यापक अभियान राबवण्यात येणार आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत ही माहिती दिली.
या मोहिमेची सुरुवात स्वतःपासून करत, एसटी चालक-वाहकांच्या ड्रग्स तपासणी मशीन खरेदीसाठी मंत्री सरनाईक यांनी एसटी महामंडळ अध्यक्ष या नात्याने १ लाख रुपयांची वैयक्तिक देणगी जाहीर केली आहे.
अभियानाची मुख्य वैशिष्ट्ये व नियोजन:
सर्व प्रकारच्या वाहतूक सेवांचा समावेश: हे अभियान केवळ एसटी महामंडळापुरते मर्यादित न राहता महानगरपालिका बस, शासकीय व कंत्राटी वाहने, खासगी ट्रॅव्हल्स, टॅक्सी, ॲप-आधारित कॅब, ऑटो रिक्षा, तसेच शाळा-कॉलेजच्या गाड्या आणि रुग्णवाहिकांपर्यंत लागू केले जाईल.
अंमली पदार्थांच्या तपासणीसाठी विशेष किट: अंमली पदार्थांची तात्काळ ओळख पटवण्यासाठी प्रमाणित विशेष तपासणी किटचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जाईल. या तंत्रज्ञानामुळे संशयित पॅकेट न उघडता थेट गांजा किंवा इतर ड्रग्सची प्राथमिक तपासणी करणे शक्य होणार आहे.
कर्तव्यपूर्व व आकस्मिक तपासणी: ड्रायव्हर्सची ड्यूटीवर जाण्यापूर्वी (Duty-entry) मद्य तपासणी, तसेच अचानक (Random) ड्रग्स टेस्ट केली जाईल.
पर्यायी चालकाची सोय व गोपनीयता: तपासणीत दोषी आढळल्यास किंवा नशेत असल्याचे संशय आल्यास चालकाला तात्काळ गाडीवरून उतरवून पर्यायी चालकाची सोय केली जाईल. तसेच चालकांच्या वैद्यकीय माहितीची गोपनीयता राखली जाईल.
उपचार आणि पुनर्वसन: नशेच्या विरोधात कठोर कारवाई करतानाच व्यसनाधीन चालकांना समुपदेशन, उपचार व पुनर्वसन सेवा देऊन त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला जाईल.
मालक व कंत्राटदारांचीही जबाबदारी नक्की होणार
केवळ चालकांवरच नव्हे, तर कंत्राटदार, शाळा, कंपन्या व वाहनमालकांवरही सुरक्षित ड्रायव्हर देण्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. या मोहिमेसाठी परिवहन, गृह, आरोग्य, शिक्षण अशा विविध विभागांच्या समन्वयाने डिजिटल मॉनिटरिंग सिस्टीम उभारली जाईल.
"प्रत्येक प्रवाशाची सुरक्षितता आणि कुटुंबाचा विश्वास जपणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असून 'नशामुक्त चालक' हा सुरक्षित महाराष्ट्राचा मुख्य पाया ठरेल," असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.