मुंबई, (प्रतिनिधी) १३ सप्टेंबर - पुणे जिल्ह्याच्या नियोजित व सर्वांगीण विकासामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (PMRDA) भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पीएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
पीएमआरडीएच्या ६७४ गावांच्या आणि ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा विचार करून नागरीकरण, औद्योगिकीकरण व पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुढील अनेक वर्षांचे दीर्घकालीन नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीतील महत्त्वाचे निर्देश आणि निर्णय:
इनर रिंग रोड अन् कनेक्टिव्हिटीवर भर: पुणे इनर रिंग रोड, 'सीएमपी' मोबिलिटी प्लॅन अंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल आणि यवत रेल्वे ब्रिज या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. शहरासह एमआयडीसी, पर्यटन, धार्मिक स्थळे व विमानतळाला जोडणारी प्रभावी वाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर भर देण्यात आला.
माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन-३: हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रो लाईन-३ चे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या मार्गिकेवरील २३ पैकी १२ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून ५ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प: इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. हे प्रकल्प भविष्यात आर्थिकदृष्ट्या शाश्वत आणि स्वयंपूर्ण राहतील अशा पद्धतीने त्यांचे नियोजन करण्यास सांगितले.
अग्निशमन यंत्रणेचे जाळे: कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्राचे काम सुरू असून, पीएमआरडीए क्षेत्रात आणखी १२ नवीन अग्निशमन केंद्रे उभारणीला गती देण्याच्या सूचना दिल्या.
पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन: वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन जलस्रोत शोधणे आणि पाणीपुरवठ्याची वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
पुण्याचा विकास केवळ रस्ते अन् इमारतींपुरता मर्यादित न ठेवता पाणी, पर्यावरण, वाहतूक आणि नागरिकांच्या जीवनमानाचा सर्वंकष विचार करणारा असावा, असा दृष्टिकोन उपमुख्यमंत्र्यांनी मांडला.