ऑटोमोबाईल क्षेत्रात आनंदाचे वातावरण... एकाच महिन्यात विकल्या इतक्या लाख गाड्या...

Share:
Main Image
Last updated: 14-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १४ सप्टेंबर - ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील वाहन विक्रीत तब्बल ११.६६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, एकूण वाहन विक्री २ लाख ६६ हजार २५३ युनिट्सवर पोहोचली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (FADA) दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमोबाईल क्षेत्रातील मागणीत ही सकारात्मक वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर 'फाडा'च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नाशिकचे सचिन वसंतराव महाजन यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यातील वाहन विक्रीची आकडेवारी:

एकूण विक्री: ऑगस्ट २०२५ मधील २,३८,४४२ युनिट्सवरून यंदा ११.६६% वाढून ती २,६६,२५३ युनिट्स झाली आहे.

दुचाकी (2W): दुचाकी विक्रीत ११.०५% वाढ नोंदवली गेली असून एकूण १,९०,८९८ दुचाकींची विक्री झाली (गेल्या वर्षी १,६४,४९२ युनिट्स).

चारचाकी/चारचाकी प्रवासी वाहने (PV): प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७.५४% वाढ झाली असून ती ५१,२४८ युनिट्सवर पोहोचली.

Advertisement

व्यावसायिक वाहने (CV): व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक ३३.३२% ची मोठी वाढ झाली असून ती १५,१७५ वर पोहोचली (गेल्या वर्षी ११,१३५).

तीनचाकी (3W): तीनचाकी वाहनांच्या विक्रीत मात्र ३७.८८% ची मोठी घट झाली असून ती ४,३२३ युनिट्सवर खाली आली (गेल्या वर्षी ६,९५९).

सचिन महाजन यांची 'फाडा'च्या अध्यक्षपदी हॅटट्रिक

नाशिक येथील उद्योजक सचिन वसंतराव महाजन हे 'महावीर व्हील्स' आणि 'महाजन इसुझू'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असून अशोक लेलँड, क्लासिक लेजंड्स, स्विच मोबिलिटी ईव्ही आणि इसुझू मोटर्सचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखालील कामगिरीची दखल घेत 'फाडा'ने त्यांची तिसऱ्या कार्यकाळासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानासोबत ग्राहकांच्या नवीन गाड्यांच्या चौकशीत वाढ, गणेशोत्सवाची खरेदी आणि लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीत झालेली कपात या घटकांमुळे ऑगस्ट महिन्यातील वाहन विक्रीला गती मिळाल्याचे सचिन महाजन यांनी स्पष्ट केले.

Comments

No comments yet.