नाशिक, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली संथ आणि निष्काळजी विकासकामे, त्यामुळे रस्त्यांवर पडलेले जीवघेणे खड्डे आता नागरिकांच्या जिवावर बेतू लागले आहेत. दिंडोरी रोडवर अशाच एका खड्ड्यामुळे भरधाव दुचाकी घसरून २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरातून महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
भारत पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल रामदास राबडे (वय २९, रा. अश्वमेधनगर, पेठरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अमोल शुक्रवारी (दि. ११) सायंकाळच्या सुमारास म्हसरूळ येथून दिंडोरी रोडने पंचवटीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जात होता. दिंडोरी रोडवरील भारत पेट्रोल पंप परिसरात कुंभमेळ्याच्या कामांमुळे रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे त्याची भरधाव दुचाकी अचानक घसरली.
डोक्याला गंभीर दुखापत, उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
अपघातात अमोल रस्त्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर दुखापती झाल्या. अपघाताची माहिती मिळताच संतप्त नागरिक आणि कुटुंबीयांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुंभमेळ्याच्या कामांचा बळी; नाशिककरांचा प्रशासनावर संताप
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. कामे संथ गतीने सुरू असून, खड्डे बुजण्याकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. विकासकामांच्या नावाखाली शहरात दररोज नागरिकांना धुळीचा आणि खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळेच अमोल राबडे या तरुण दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत नाशिककरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. "आणखी किती निष्पापांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.