हत्तीण ‘माधुरी’चे कोल्हापूरच्या नांदणी मठात पुनरागमन... देखभालीसाठी ‘वनतारा’ काही करणार का?

Share:
Main Image
Last updated: 12-Sep-2026

कोल्हापूर, (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर - गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला हत्तीण 'माधुरी'चा प्रवास अखेर तिच्या जुन्या निवासस्थानाकडे वळला आहे. हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) मंजुरीनंतर माधुरीचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नांदणी मठात पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आणि सर्व बाबींची पाहणी केल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 'वनतारा' संस्थेने या निर्णयाचे स्वागत करत माधुरीच्या पुढील आरोग्य आणि देखभालीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

‘माधुरी’च्या पुनरागमनासाठी कमिटीच्या कडक अटी

माधुरीला नांदणी मठात परत पाठवताना तिच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी कमिटीने काही कठोर अटी घातल्या आहेत:

कामावर पूर्ण बंदी: माधुरीकडून कोणतेही वजन उचलणे किंवा कष्टाचे काम करून घेतले जाणार नाही.

मिरवणुकीत सहभागास मनाई: कोणत्याही धार्मिक, सामाजिक अथवा सार्वजनिक मिरवणुकीत तिचा वापर करता येणार नाही.

२४ तास देखभाल: तिची २४ तास निगा राखणे आणि नियमित वैद्यकीय सुविधा पुरवणे बंधनकारक असेल.

दर १५ दिवसांनी तपासणी: दर १५ दिवसांनी तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून तिची सखोल आरोग्य तपासणी केली जाईल.

Advertisement

'वनतारा'कडून वैद्यकीय व भौतिक सहकार्य कायम

हाय-पॉवर्ड कमिटीच्या निर्देशानुसार ३० जुलै २०२५ रोजी माधुरीला वैद्यकीय उपचारांसाठी गुजरात येथील 'वनतारा' पुनर्वसन केंद्रात आणण्यात आले होते. वनताराच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या प्रयत्नांमुळे तिच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली असून सद्यस्थितीत तिची प्रकृती स्थिर आहे.

वनताराने स्पष्ट केले की, कमिटीच्या निर्णयाचा आदर करत माधुरी मठात परतल्यानंतरही तिच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल.

पशुवैद्यकीय पथक: वनताराचे तज्ज्ञ डॉक्टर दर १५ दिवसांनी नांदणी मठात जाऊन तिची आरोग्य तपासणी करतील.

साहित्य व औषध पुरवठा: नांदणी मठातील तिचे निवासस्थान अधिक सुसज्ज करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साधने, उपकरणे आणि औषधांचा पुरवठा वनताराने केला आहे.

न्यायालय अन् प्रशासनाचे मानले आभार

"माधुरीच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, हाय-पॉवर्ड कमिटी तसेच महाराष्ट्र आणि गुजरात सरकारचे आभारी आहोत. माधुरी भविष्यात कुठेही असली, तरी तिचे उत्तम आरोग्य, सुरक्षितता आणि दीर्घायुष्य हीच आमची प्राथमिकता राहील," असे मत वनतारा प्रशासनाने व्यक्त केले आहे.

माधुरीच्या या पुनरागमनामुळे नांदणी मठ परिसरासह कोल्हापुरातील भाविक आणि प्राणीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Comments

No comments yet.