देशभरात ८ मोठे छापे... रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गावरील हे नेटवर्क उद्ध्वस्त...

Share:
Main Image
Last updated: 10-Sep-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १० सप्टेंबर - अमली पदार्थांच्या बेकायदेशीर तस्करीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशभरात धडक कारवाईची मोहीम उघडली आहे. गेल्या १५ दिवसांत राबवलेल्या आठ वेगवेगळ्या मोहिमांमध्ये डीआरआयने ७४० किलो गांजा (हायड्रोपोनिक गांजासह) आणि चरस असा मोठा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी 'एनडीपीएस' (NDPS) कायद्यांतर्गत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये ७०९.६ किलो नेहमीचा गांजा, २४.५ किलो उच्च दर्जाचा परदेशी हायड्रोपोनिक गांजा आणि ५ किलो चरसचा समावेश आहे.

 देशभरातील प्रमुख कारवायांचा तपशील:

रायपूर (छत्तीसगड): ८ सप्टेंबर रोजी विशाखापट्टणमहून येणारे दोन ट्रक रोखून ३७५.९५ किलो गांजा जप्त करत ४ जणांना अटक करण्यात आली. यापूर्वी २६ ऑगस्ट रोजीही रायपूरजवळ ट्रकमधून १२४ किलो गांजा जप्त करण्यात आला होता.

पाटणा (बिहार): औरंगाबाद-पाटणा महामार्गावर छापा टाकताना तस्करांनी डीआरआय अधिकाऱ्यांवर हल्ला केला. यात एक अधिकारी जखमी झाला. या कारवाईत चालकाच्या केबिनमधील गुप्त कप्प्यातून १४०.५ किलो गांजा जप्त केला गेला.

Advertisement

लुधियाना (पंजाब): कारच्या पाय ठेवण्याच्या जागेखाली (फूटरेस्ट) पोकळी तयार करून लपवलेला ६९ किलो गांजा जप्त करून दोन जणांना अटक केली.

गोरखपूर (उत्तर प्रदेश): गोरखपूर रेल्वे स्थानकावर अमरनाथ एक्सप्रेसमधून नेपाळहून तस्करी करून आणलेले ५ किलो चरस जप्त केले. दोन प्रवाशांनी हे चरस आपल्या मांड्यांना गुंडाळून साडीत लपवले होते. या प्रकरणी तीन जणांना बेड्या ठोकल्या.

बेंगळुरू व हैदराबाद विमानतळ: व्हिएतनाम (हनोई) आणि थायलंड (बँकॉक) येथून आलेल्या तीन प्रवाशांना अडवून त्यांच्याकडून २४.६ किलो उच्च क्षमतेचा 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त करण्यात आला.

तस्करीच्या नवनव्या क्लृप्त्यांचा पर्दाफाश

तस्करांनी वाहनांमध्ये तयार केलेले गुप्त कप्पे, पायाला गुंडाळून केलेली तस्करी तसेच आंतरराष्ट्रीय विमानांमधून छुप्या रीतीने आणलेला अमली पदार्थांचा साठा डीआरआयच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीच्या माध्यमातून होणारी ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी डीआरआयने आपले नेटवर्क अधिक मजबूत केले आहे.

?s=20

Comments

No comments yet.