जळगाव, (प्रतिनिधी) १० सप्टेंबर - पाचोरा तालुक्यातील भोकरी, वरखेडी-पिंपळगाव रोड आणि भवरखेड परिसरातील ‘मे. श्री महासर माता राईस मिल’ येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. प्राप्त माहितीच्या आधारे ७ ते ९ सप्टेंबर २०२६ दरम्यान टाकण्यात आलेल्या धाडीत शासकीय सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी (PDS) संबंधित असल्याचा संशय असलेला फोर्टीफाइड तांदळासह एकूण २,९६,४७६ किलो तांदळाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या जप्त साठ्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ७८ लाख ६३ हजार १५० रुपये इतकी आहे.
विविध प्रकारच्या तांदळाचा साठा आढळला
कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एकूण ६ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. जप्त केलेल्या तांदळामध्ये खालील साठ्याचा समावेश आहे:
फोर्टीफाइड राईस: ६४,५४६ किलो
ब्रोकन राईस: १,३७,९९६ किलो
राईस (Gustolo's एक्सपोर्ट): ८१,४९६ किलो
मलेशिया एक्सपोर्ट राईस (५% ब्रोकन): ६,९९६ किलो
ब्रोकन राईस मिसब्रँडेड: ३,४४६ किलो
प्लेन राईस (विनालेबल): १,९९६ किलो
सदर आस्थापना केंद्रीय अन्न परवानाधारक असल्याने याबाबत केंद्रीय अन्न परवाना प्राधिकरणास कळविण्यात आले आहे. जप्त केलेला फोर्टीफाइड तांदूळ खरोखरच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील आहे का, या दिशेने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सखोल तपास सुरू आहे.
अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन
तपासणीदरम्यान राईस मिलमध्ये अत्यंत अस्वच्छता आढळून आली. तांदूळ थेट जमिनीवर साठवणे, परिसरात उंदराची विष्ठा, धूळ आणि कोळ्यांची जाळी असणे, तांदळाच्या पोत्यांवर उत्पादकाचा पत्ता नसणे तसेच खरेदीची बिले सादर न करणे अशा अनेक त्रुटी समोर आल्या. याप्रकरणी 'अन्न सुरक्षा व मानके अधिनियमा'अंतर्गत कडक कार्यवाही केली जात आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, सह आयुक्त (अन्न) एस. एस. जाधव आणि नाशिक विभागाचे सह आयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे व अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, आकाश बोऱ्हाडे, किशोर साळुंखे आणि योगराज सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.
नागरिकांना आवाहन: जिल्ह्यात कोठेही अन्न भेसळीचा प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी एफडीएच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर किंवा https://complaints.mahafda.in या तक्रार पोर्टलवर नोंदवावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.