जळगाव, (प्रतिनिधी) ९ सप्टेंबर - शेतजमिनीच्या मोजणीसाठी लागणारे स्कीम पत्रक व टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी वृद्ध शेतकऱ्याकडून २०० रुपयांची लाच स्वीकारताना उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रंगेहात पकडले. भगवान रोहीदास गायकवाड (वय ५१, रा. प्लॉट ६९, लहुलिला नगर, भुसावळ) असे या वर्ग-३ कर्मचाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यावर यापूर्वीही लाचखोरीचा गुन्हा दाखल असून हा त्याचा दुसरा गुन्हा ठरला आहे.
नेमके प्रकरण काय?
जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथील ६५ वर्षीय तक्रारदार शेतकऱ्याला आपल्या शेतीची मोजणी करावयाची होती. त्यासाठी त्यांना शासकीय स्कीम पत्रक व टिपण उतारा आवश्यक असल्याने त्यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी भूमी अभिलेख कार्यालय, जामनेर येथे रीतसर अर्ज केला होता. मात्र, सदर उताऱ्यांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी भूकरमापक (प्रतिलिपी) भगवान गायकवाड याने तक्रारदाराकडे सुरुवातीला ७०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने ७ सप्टेंबर रोजी जळगाव एसीबी कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवली.
सापळा आणि कारवाई
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने मंगळवारी, ८ सप्टेंबर २०२६ रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जामनेर येथे पंचांच्या उपस्थितीत पडताळणी केली. त्यावेळी गायकवाड याने तडजोडीअंती २०० रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रचण्यात आलेल्या सापळ्यात आरोपी गायकवाड याने तक्रारदाराकडून २०० रुपयांची रक्कम पंचांसमक्ष स्वतः स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने झडप घालून त्याला रंगेहात पकडले.
आरोपीविरुद्ध लाचखोरीचा दुसरा गुन्हा
आरोपी भगवान गायकवाड याच्याविरुद्ध यापूर्वी २०१२ मध्येही भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. शासकीय सेवेत असताना लाचेसंबंधीचा हा त्याचा दुसरा गुन्हा ठरला आहे. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदर धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, अंमलदार बाळू मराठे, प्रणेश ठाकूर व सचिन चाटे यांच्या पथकाने यशस्वी केली.