अवयव दानासाठी राज्यात इतके रुग्ण प्रतीक्षेत... आरोग्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश...

Share:
Main Image
Last updated: 09-Sep-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ९ सप्टेंबर - महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सुधारित नियमांमुळे राज्यात अवयवदानाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि प्रादेशिक तसेच विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्रांच्या (ROTTO / SOTTO - मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर) संयुक्त प्रयत्नांमुळे अवयवदानाबाबत मोठी सामाजिक जागृती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील अवयवदानाची चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी राज्यभरात व्यापक प्रबोधन मोहीम राबविण्याचे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

प्रत्यारोपणाची प्रभावी आकडेवारी (१९९५ ते ऑक्टोबर २०२६)

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत पार पडलेल्या यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:

जिवंत व्यक्तींमधील अवयव प्रत्यारोपण (एकूण १७,३२५):

मूत्रपिंड (किडनी): १४,९४९

यकृत (लिव्हर): २,३७६

मरणोत्तर अवयवदान (एकूण ३,३७३ लाभार्थी):

मूत्रपिंड: १,८५३ | यकृत: ९८७ | हृदय: २२० | फुफ्फुस: ६३ | नेत्र व उतींसह इतर अवयव: २५०

Advertisement

अजूनही हजारो रुग्ण प्रतीक्षारत

अवयवदानाचे प्रमाण वाढले असले तरी आजही अनेक रुग्ण नव्या आयुष्याची वाट पाहत आहेत. सध्या राज्यातील विविध अवयव प्रत्यारोपण केंद्रांकडे ४,०७५ रुग्ण मूत्रपिंडासाठी, ८८८ रुग्ण यकृतासाठी, ६३ हृदयासाठी, २४ फुफ्फुसासाठी, १५ स्वादुपिंडासाठी, ११ हातासाठी आणि ८ रुग्ण लहान आतड्याच्या प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत आहेत.

'जुगजुग जियो अभियान' अन् महाअवयवदान महोत्सव

नागरिकांमधील अंधश्रद्धा दूर करून जनजागृती करण्यासाठी राज्यात केंद्र सरकारच्या ‘अंगदान-जीवन संजीवनी अभियाना’अंतर्गत ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जुगजुग जियो अभियान’ आणि २ ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान 'अवयवदान पंधरवडा' साजरा करण्यात आला.

शपथ आणि प्रतिज्ञापत्र: अधिकृत संकेतस्थळ व QR कोडद्वारे शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयवदानाची शपथ घेतली.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग: जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचाऱ्यांसाठी व्याख्याने आयोजित करून त्यांच्याकडून अवयवदानाचे अर्ज भरून घेण्यात आले.

युवा पिढी आणि समाजप्रबोधन: शाळा-महाविद्यालयांमध्ये रॅली, चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच पथनाट्ये, चित्रपटगृहांमधील जाहिराती, आकाशवाणी संदेश, लघुपट आणि 'महाअवयवदान महोत्सव' द्वारे व्यापक प्रचार करण्यात आला.

दात्यांच्या कुटुंबांचा सन्मान: दरवर्षीप्रमाणे अवयवदान करणाऱ्या दात्यांच्या कुटुंबांचा विशेष सन्मान करून शासनातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

Comments

No comments yet.