कळवण, (प्रतिनिधी) ०८ सप्टेंबर - श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नांदुरी ते सप्तशृंगी गड या घाट रस्त्यावरील काँक्रिटीकरणाच्या कामासाठी हा रस्ता दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेपासून ते दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.
कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर कामाला गती
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मौजे सप्तशृंगी गड – नांदुरी – अभोणा – कनाशी – मानूर – अलियाबाद (रा.मा. २१) या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ४ (कळवण) यांच्यामार्फत सुरू आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या दृष्टीने गडावर लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, हे काम विहित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक बंदीचा निर्णय
घाट रस्त्यावर कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवल्यास काम पूर्ण क्षमतेने करणे शक्य होणार नाही. तसेच या घाट रस्त्याला कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने प्रवाशांच्या व भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि कामाचा दर्जा राखण्यासाठी हा मार्ग बंद ठेवणे गरजेचे असल्याचे सा.बां. उपविभागाने कळवले होते.
त्यानुसार, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करत कळवण उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. कश्मिरा संखे (भा.प्र.से.) यांनी हा रस्ता १० ते २६ सप्टेंबर या १७ दिवसांच्या कालावधीसाठी वाहतुकीस बंद ठेवण्याचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.
भाविकांना प्रशासनाचे आवाहन
या कालावधीत गडावर जाणाऱ्या भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियोजित कामाच्या दिवसांत प्रवासाचे नियोजन तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.