मुसळधार पाऊस, ९°C तापमान, वादळी वारा... १५.५२ तासात २२६ किमीचे खडतर आव्हान... नाशिकच्या महिला डॉक्टरची जबरदस्त कामगिरी...

Share:
Main Image
Last updated: 07-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ सप्टेंबर - नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरीची भर पडली आहे. नाशिक येथील प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ (ENT सर्जन) आणि 'स्ट्रायकिंग स्ट्रायडर्स' (Striking Striders) ग्रुपच्या सदस्या डॉ. रुशिका पटेल यांनी एस्टोनियाची राजधानी टॅलिन येथे आयोजित अत्यंत प्रतिष्ठेची आणि आव्हानात्मक 'आयर्नमॅन टॅलिन २०२६' (Ironman Tallinn 2026) ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ही खडतर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला ENT सर्जन ठरल्या आहेत.

१५ तासांत गाठले २२६ किलोमीटरचे उद्दिष्ट:

ही स्पर्धा २२ ऑगस्ट रोजी पार पडली. डॉ. रुशिका पटेल यांनी १५ तास ५२ मिनिटे ४२ सेकंद अशा कौतुकास्पद वेळेत एकूण २२६ किलोमीटरचे अंतर पार केले. यामध्ये त्यांनी तिन्ही प्रकारांत उत्कृष्ट टायमिंग नोंदवले:

३.८ किमी पोहणे: १ तास ५४ मिनिटे २३ सेकंद

१८० किमी सायकलिंग: ८ तास ०८ मिनिटे ४० सेकंद

Advertisement

४२.२ किमी धावणे (फुल मॅरेथॉन): ५ तास ३२ मिनिटे ३५ सेकंद

प्रतिकूल हवामानावर जिद्दीने मात:

टॅलिन येथील हवामान अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक होते. मुसळधार पाऊस, सुसाट वारे आणि अवघे ९ अंश सेल्सिअस असणारे गोठवणारे तापमान यांमुळे शर्यत पूर्ण करणे अत्यंत कठीण झाले होते. या स्पर्धेत जगभरातून १,९३२ खेळाडू सहभागी झाले होते, मात्र या कडक हवामानामुळे केवळ १,५५९ खेळाडूच शर्यत पूर्ण करू शकले. या कठीण परिस्थितीतही डॉ. पटेल यांनी आपल्या असीम जिद्द, चिकाटी आणि मानसिक ताकदीच्या जोरावर हे आव्हान लीलया पेलले.

'स्ट्रायकिंग स्ट्रायडर्स' कडून विशेष सत्कार:

डॉ. रुशिका पटेल यांच्या या ऐतिहासिक यशामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'स्ट्रायकिंग स्ट्रायडर्स' तर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. वैद्यकीय व्यवसायासारख्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून त्यांनी मिळवलेले हे यश नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असून, आरोग्य आणि फिटनेस क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Comments

No comments yet.