अक्षय काळे, (मुंबई) ०६ सप्टेंबर - "देशात बेरोजगारी, महागाई आणि शिक्षणाचा बोजवारा उडालेला असताना जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी धर्माची गुंगी दिली जात आहे. लोकांचे मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून हे सगळे सुरू असून, आगामी गणेशोत्सवात दंगली घडवल्या जाण्याची दाट भीती आहे," असा गंभीर इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील सुजाण नागरिकांनी सतर्क राहावे, असे थेट आवाहनही त्यांनी केले.
आज ६ सप्टेंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सणांमधील वाढता विकृतपणा, अर्थव्यवस्थेची स्थिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी आणि महापुरुषांचा सन्मान अशा विविध मुद्द्यांवर राज्य व केंद्र सरकारवर तोफ डागली.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
डीजे, डॉल्बी आणि उत्तरेतील संस्कृतीवर प्रहार:
"डीजे आणि डॉल्बी ही उत्तरेतील संस्कृती आपण महाराष्ट्रात कशाला आणतोय? दहीहंडीच्या वेळी काही महिलांना व्यासपीठावर आणून नाचवले जाते; हे प्रकार उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये चालतात. आपण त्यांना शिकवायचे की त्यांची ही संस्कृती इकडे आणायची? सण साजरे करण्याचे काही नियम आणि प्रोटोकॉल असले पाहिजेत. उत्सव आपल्या पारंपरिक संस्कृतीनुसारच साजरे झाले पाहिजेत. नागपुरात डीजेवर बंदी घातली जाऊ शकते, तर संपूर्ण महाराष्ट्रात का नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महापुरुषांच्या रांगेत कोणालाही स्थान नाही:
सरकारी कार्यालयांतील फोटोंबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, "पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात नक्की लावा, पण तो दुसऱ्या भिंतीवर लावावा. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रांगेत दुसरं कोणीही बसू शकत नाही."
धर्माभिमानी असा, धर्मांध नको:
"आपण धर्माभिमानी असलं पाहिजे, धर्मांध होता कामा नये. सध्या जनतेला जाणीवपूर्वक धर्मांध केले जात आहे, जेणेकरून रोजगारासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे तुमचे लक्ष जाऊ नये," असा टोला त्यांनी लगावला.
डगमगलेली अर्थव्यवस्था आणि उद्योगांचे पलायन:
देशाच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते म्हणाले, "पंतप्रधान परदेशातून भारतीयांना परदेशात जाऊ नका, सोने खरेदी करू नका असे सांगतात आणि दुसरीकडे जीडीपी वाढल्याचा दावा केला जातो. देशातील ५०३ परदेशी कंपन्यांनी आपले कामकाज बंद केले आहे. २०१८-१९ पासून २०० ते २५० कोटींची गुंतवणूक करू शकणारे तब्बल १३,००० उद्योगपती देश सोडून गेले. जर जीडीपी ७.८ टक्के आहे, तर मग हे उद्योजक देश सोडून का जात आहेत? अर्थव्यवस्था ढासळल्यामुळेच आज विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, उद्या हाच उद्रेक संपूर्ण देशात पाहायला मिळेल."
निवडणुकीतील बोगस मतदारांवरून सवाल:
२०२४ च्या निवडणुकांबाबत धक्कादायक दावा करत राज ठाकरे म्हणाले, "कल्याण ग्रामीण मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी जी नवीन मतदार नोंदणी झाली होती, त्यातील ९५ टक्के बोगस नावे आता एसआयआरच्या (SIR) माध्यमातून वगळण्यात आली आहेत. याचाच अर्थ २०२४ मध्ये सत्ताधारी पक्ष खोट्या मतदारांच्या जोरावर निवडून आला का?"