धुळे, (प्रतिनिधी) ६ सप्टेंबर - "धुळे जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग हे केवळ दळणवळणाचे मार्ग नसून उद्योग, व्यापार, शेती आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे महत्त्वाचे दुवे आहेत. त्यामुळे महामार्गांची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. अपघातप्रवण ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अंडरपास, उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांची (सर्व्हिस रोड) कामे वेगाने मार्गी लावावीत," असे स्पष्ट निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) धुळे प्रकल्प अंमलबजावणी युनिटअंतर्गत सुरू असलेल्या व सन २०२६-२७ मध्ये प्रस्तावित विविध महामार्ग प्रकल्पांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, NHAI चे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाचे प्रकल्प:
१. कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-मध्य प्रदेश सीमा महामार्ग (प्रकल्प खर्च: ₹२,००० कोटी)
लांबी: सुमारे १६५ किलोमीटर (चारपदरी प्रवेश नियंत्रित राष्ट्रीय महामार्ग).
अपेक्षित खर्च: भूसंपादनासाठी ₹३०० कोटी, तर बांधकामासाठी ₹१,७०० कोटी.
फायदा: शेतमाल व औद्योगिक मालाच्या वाहतुकीसह मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या दळणवळणाला मोठी चालना मिळेल.
२. अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना
पळासनेर, वाघाडी व सांगवी: २.९८८ किमी लांबीच्या अंडरपास व सुधारात्मक उपायांसाठी ₹६४.९१ कोटी मंजूर.
एसआरपीएफ धुळे, अकलाड-मोराणे, तामसवाडी व इच्छापूर: अंडरपास व सर्व्हिस रोडच्या ४.३६ किमी कामासाठी ₹७३.१० कोटी अपेक्षित.
साक्री-शेवाळी जंक्शन: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपूल व सर्व्हिस रोडसाठी ₹४२.१० कोटी खर्च केले जाणार आहेत.
सरवड फाटा, गोराणे फाटा व सावळदे फाटा: स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अंडरपासच्या कामांचा 'डीपीआर' (DPR) प्रगतिपथावर.
३. रस्ते चौपदरीकरण आणि मजबुतीकरण
फागणे ते पारोळा चौफुली: ५.२९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण आणि चौपदरीकरणासाठी ₹३५.८१ कोटी खर्च केले जातील.
जळगाव ते नाशिक मार्ग: सुमारे २०० किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला.
"नागरिकांची सुरक्षितता आणि कामाचा दर्जा याला प्राधान्य"
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले की, महामार्गांवर वेगासोबतच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे तितकेच गरजेचे आहे. रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तात्पुरत्या उपायांपेक्षा अंडरपास आणि सर्व्हिस रोडसारख्या कायमस्वरूपी सोयी उभारण्यावर भर दिला जात आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी आपसांत समन्वय ठेवून कामांचा दर्जा राखत प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.