नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३१ ऑगस्ट - राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा 'निर्भया' प्रकरणाच्या भीषण आठवणी जाग्या करणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातून आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या स्लीपर बसमध्ये चालक आणि कंडक्टरने सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कश्मीरी गेट पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून गुन्ह्यात वापरलेली बस जप्त केली आहे.
मुसळधार पावसामुळे चुकली वाट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील असून ती इयत्ता ११ वीमध्ये शिकते. आई अभ्यासावरून रागावल्याने ती घरातून निघून नोएडा सेक्टर-६३ येथे राहणाऱ्या तिच्या चुलत भावाकडे चालली होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती परी चौक येथे चुकीने उतरली. त्याच वेळी तिला एक स्लीपर बस दिसली. सेक्टर-६३ ला जाते का? अशी विचारणा केली असता बसच्या कंडक्टरने तिला बसमध्ये बसवून घेतले.
पडद्याच्या आड भयानक कृत्य
बस तांत्रिक दुरुस्तीसाठी सूरजपूर येथील वर्कशॉपमध्ये गेली होती आणि दुरुस्तीनंतर चालक कुलदीप व कंडक्टर संदीप हे बस घेऊन उत्तर दिल्लीतील तिमारपूर पार्किंगकडे निघाले होते. त्यामुळे बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. तिने प्रतिकार केला असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. बसच्या खिडक्यांना पडदे असल्यामुळे बाहेरून आत काहीच दिसत नव्हते. परी चौक ते कश्मीरी गेट या संपूर्ण प्रवासादरम्यान आरोपींनी तिला बसमध्येच डांबून ठेवले आणि कश्मीरी गेट बस स्थानकाजवळ तिला रस्त्यावर सोडून पळ काढला.
पीडितेचे धाडस आणि पोलिसांची धडक कारवाई
घटनेनंतर खचून न जाता पीडित मुलीने थेट कश्मीरी गेट पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून तिची तक्रार नोंदवली आणि सामूहिक बलात्कार, अपहरण व मारहाणीसह 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी बसचा मार्ग शोधून काढत तिमारपूर पार्किंगमधून आरोपी चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांना अटक केली. फॉरेन्सिक टीमने बसमधून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.
या घटनेमुळे दिल्लीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.