नेपाळ महापुरातून महाराष्ट्राच्या लेकरांची सुटका... पार केली चीनची सीमा... आज येथे पोहोचणार...

Share:
Main Image
Last updated: 31-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) ३१ ऑगस्ट - नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या बचाव मोहिमेला मोठे यश आले आहे. काल सायंकाळी ६९ पर्यटकांनी चीनची सीमा ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश केला असून, हे सर्वजण आज, ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचणार आहेत. या बातमीमुळे अडकलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

५०% हून अधिक पर्यटक सुखरूप परतले

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे (SEOC) नोंद झालेल्या ४०४ पर्यटकांपैकी २६२ जण अद्याप नेपाळ किंवा चीनमध्ये अडकले होते. यापैकी ६९ पर्यटकांना सुखरूप परत आणण्यात यश आले आहे. यापूर्वीच १४२ नागरिक मायदेशी परतले आहेत. उर्वरित पर्यटकांनाही सुरक्षितपणे परत आणण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम वेगाने सुरू आहे.

राज्य सरकारचा सक्रिय पाठपुरावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली SEOC द्वारे ही बचाव मोहीम राबवली जात आहे.

Advertisement

केंद्रीय यंत्रणांशी समन्वय: परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (MEA), नवी दिल्लीतील एकात्मिक नियंत्रण कक्ष आणि महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून चीन, तिबेट आणि नेपाळमधील स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क साधला जात आहे.

बचाव पथके तैनात: बाधित भागातील अचूक माहिती बचाव पथकांना दिली जात असून, त्या आधारे अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

वेब लिंक व डेटा संकलन: पर्यटकांची अचूक माहिती मिळवण्यासाठी विशेष वेब-आधारित लिंक विकसित करण्यात आली आहे.

२४×७ हेल्पलाइन कार्यरत: '१०७०' वर संपर्क साधा

अडकलेल्या पर्यटकांचे कुटुंबीय आणि ट्रॅव्हल एजन्सींशी २४ तास सतत समन्वय साधला जात आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आणि संचालक भालचंद्र चव्हाण या संपूर्ण मोहिमेवर थेट लक्ष ठेवून आहेत.

कोणत्याही तातडीच्या मदतीसाठी किंवा माहितीसाठी राज्य प्रशासनाने '१०७०' हा मोफत आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

Comments

No comments yet.