पुणे, (प्रतिनिधी) ३० ऑगस्ट - दिल्लीहून पुणे रेल्वे स्थानकावर आलेल्या एका महिला प्रवाशाकडून अमली पदार्थविरोधी पथकाने (DRI) तब्बल २.५३ किलो ॲम्फेटामाइन आणि ८७८ ग्रॅम वजनाच्या एमडीएमए (MDMA/Ecstasy) च्या गोळ्या जप्त केल्या आहेत. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने (महसूल गुप्तचर संचालनालय) २५ ऑगस्ट २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली.
याच मोहिमेअंतर्गत बंगळुरू आणि पुणे अशा दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मिळून १८ किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून एकूण चार तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पुणे जंक्शनवर असा रचला सापळा
हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली) रेल्वे स्थानकावरून सुटलेल्या ट्रेनमधून एक महिला मोठा अमली पदार्थांचा साठा घेऊन पुण्यात येत असल्याची पक्की बातमी डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी पुणे जंक्शनवर विशेष पथकाने सापळा रचला.
संशयित महिला स्थानकावर उतरताच तिला ताब्यात घेण्यात आले. तिच्या सामानाची बारकाईने झडती घेतली असता, पांढऱ्या-पिवळसर रंगाचा स्फटिकयुक्त २.५३ किलो ॲम्फेटामाइन आणि ८७८ ग्रॅम एमडीएमएच्या (MDMA) रंगीबेरंगी गोळ्या सापडल्या. हा सर्व मुद्देमाल एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत तत्काळ जप्त करून संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.
दुसरी कारवाई: बंगळुरूमध्ये १४.९ किलो ड्रग्जसह ३ जण जेरबंद
पुण्यातील कारवाईसोबतच डीआरआयने त्याच दिवशी केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकावरही कारवाई केली. दिल्लीहून आलेल्या एका महिला प्रवाशाकडून १४.९ किलो ॲम्फेटामाइन जप्त करण्यात आले. इतकेच नव्हे, तर डीआरआयने पुढे सापळा रचून हा माल स्वीकारण्यासाठी आलेल्या अन्य दोन साथीदारांनाही रंगेहात पकडले.
पंधरवड्यात १५० किलो 'सिंथेटिक ड्रग्ज' जप्त
देशभरात चालणारे कृत्रिम अमली पदार्थांचे (Synthetic Drugs) नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी डीआरआयने कारवाईचा तीव्र बडगा उगारला आहे. गेल्या १५ दिवसांत डीआरआयने ५ वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे १५० किलो ॲम्फेटामाइन-प्रकारचे (ATS) ड्रग्ज जप्त केले आहेत.
यात ईशान्य सीमेवर जप्त केलेल्या ७६ किलो मेथॅम्फेटामाइन गोळ्या आणि सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मक्याच्या पाकिटांमध्ये लपवून पाठवल्या जाणाऱ्या ५५.८६ किलो मेथॅम्फेटामाइनचा समावेश आहे. पुण्यात पकडलेल्या या महिलेचे आंतरराष्ट्रीय तस्करांशी कनेक्शन आहे का, याचा अधिक तपास डीआरआय करत आहे.