पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ शिक्षकांची भरती... मुलाखतीशिवाय...

Share:
Main Image
Last updated: 30-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) ३० ऑगस्ट - राज्यातील शिक्षक भरती प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 'पवित्र पोर्टल'च्या (PAVITRA Portal) माध्यमातून राबवण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील 'मुलाखतीशिवाय' (Without Interview) प्रकारात तब्बल १३ हजार ११९ पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) च्या आधारे अत्यंत पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि गुणवत्तेच्या निकषावर ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

तक्त्यामध्ये पाहा व्यवस्थापन व पद प्रकारानुसार झालेली शिफारस:

१. व्यवस्थापननिहाय पदसंख्या:

जिल्हा परिषद: ८,४८१

महानगरपालिका: १,३०६

नगरपालिका / परिषदा: २२६

आदिवासी विकास विभाग (शासकीय शाळा): १,६०१

खाजगी शैक्षणिक संस्था: १,४५१

Advertisement

शासकीय विद्यानिकेतन: ५४

२. वर्ग/इयत्तानिहाय पदसंख्या:

इयत्ता १ ली ते ५ वी: ७,५४१

इयत्ता ६ वी ते ८ वी: ४,२०७

इयत्ता ९ वी ते १० वी: १,११९

इयत्ता ११ वी ते १२ वी: २५२

उमेदवारांना लॉगिन व SMS द्वारे माहिती:

शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निवड झालेल्या सर्व उमेदवारांच्या 'पवित्र पोर्टल'वरील वैयक्तिक लॉगिनवर निवडीची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS द्वारेही कळवण्यात आले आहे.

नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) प्रभावी अंमलबजावणी करत समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.

Comments

No comments yet.