मतदार नोंदणी अर्जांचा घोटाळा उघड... एकावर गुन्हा, ५ अधिकारी निलंबित... नेमका काय आहे प्रकार?

Share:
Main Image
Last updated: 30-Aug-2026

नवी मुंबई, (प्रतिनिधी) ३० ऑगस्ट - १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत अत्यंत गोपनीय असलेली निवडणूक आयोगाची गणना प्रपत्रे (Enumeration Forms) बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगून त्यांची झेरॉक्स काढल्याचा धक्कादायक प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित ५ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) तत्काळ निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Advertisement

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद दादा भोईर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

तपासातील महत्त्वाचे मुद्दे व कारवाई:

३,४०० अनधिकृत प्रपत्रे जप्त:
खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स सेंटरवर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मारलेल्या छाप्यात मुर्बी गावातील रहिवासी सूरज पाटील हे ३,४०० गणना प्रपत्रांची झेरॉक्स काढताना रंगेहात सापडले. ही प्रपत्रे ११ मतदान केंद्रांशी संबंधित होती.

गुन्हा दाखल (FIR):

निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सूरज पाटील यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात (FIR क्र. ०४०९/२६) भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५ बीएलओ (BLO) निलंबित:

ज्या ५ बीएलओंकडून ही संवेदनशील कागदपत्रे बाहेर गेली, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, पनवेल महापालिका आयुक्तांना भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३२ अंतर्गत या ५ बीएलओंना तत्काळ निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सखोल चौकशी सुरू:

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी पनवेल महापालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

?s=20

Comments

No comments yet.