नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट - केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (सीबीएन) मध्य प्रदेश विभागाने अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात राबवलेल्या 'ऑपरेशन वज्र २.०' अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. पंजाब-हिमाचल प्रदेश मार्गावर चंडीगड-बड्डी रस्त्यावर सापळा रचून पथकाने एका ट्रकमधून तब्बल ६६ लाख ७९ हजार ९८० सायकोट्रॉपिक गोळ्यांचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, मालवाहू ट्रक जप्त करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई
नीमच विभागाकडून मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे सीबीएन पथकाने २७ आणि २८ ऑगस्ट दरम्यान चंडीगड-बड्डी मार्गावर पाळत ठेवली होती. रात्रभर ठेवलेल्या पाळतीनंतर संशयित उत्तर प्रदेश पासिंगचा एसएमएल ट्रक रोखून त्याची सखोल तपासणी करण्यात आली. ट्रकमधील खोक्यांची झडती घेतली असता, त्यामध्ये १२० मास्टर कार्टन आढळून आले. यात अल्प्राझोलॅम, ट्रामाडोल, नायट्राझेपॅम आणि क्लोनाझेपॅम या नियंत्रित सायकोट्रॉपिक औषधांच्या एकूण ६६,७९,९८० गोळ्या कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय वाहून नेल्या जात असल्याचे उघडकीस आले.
तपास टाळण्यासाठी बॅच नंबर आणि तारखा पुसल्या
कारवाईदरम्यान अंमलबजावणी यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी तस्करीचे मोठे जाळे कार्यरत असल्याचे समोर आले. औषधांच्या स्ट्रिप्स आणि बॉक्सवर छापलेले बॅच क्रमांक, उत्पादन आणि एक्सपायरी तारखा जाणीवपूर्वक पुसून टाकण्यात आल्या होत्या. तसेच, “पंजाब-हरियाणा मध्ये विकण्यास प्रतिबंध” असे स्पष्ट निर्देश असलेले खोके विनाबिलाने त्याच भागात पाठवले जात होते. ही संपूर्ण जप्ती आणि सीलबंद करण्याची प्रक्रिया सलग १४ तासांहून अधिक काळ सुरू होती.
आंतरराज्यीय रॅकेटचा शोध सुरू
या प्रकरणी एनडीपीएस (NDPS) कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार संशयिताला अटक करण्यात आली आहे. या बेकायदेशीर औषध पुरवठा साखळीचे मूळ आणि पुढील वितरणाचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी सीबीएनकडून सखोल तपास केला जात आहे.
दरम्यान, 'नशामुक्त भारत अभियाना'अंतर्गत सीबीएनने चालू वर्षात जोरदार कारवाया केल्या असून, आतापर्यंत १९७ गुन्हे नोंदवून २७२ तस्करांना अटक केली आहे. तसेच ५१ हजार किलो विविध अंमली पदार्थ आणि सुमारे १२ कोटी ७२ लाख सायकोट्रॉपिक गोळ्या जप्त करत ६ बेकायदेशीर प्रयोगशाळांचा पर्दाफाश केला आहे.