अक्षय काळे, (मुंबई) २९ ऑगस्ट - आदिवासी विद्यार्थ्यांमधील रक्तक्षय (ॲनिमिया) समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आक्रमक पाऊल उचलले आहे. विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या व्यापक 'ॲनिमिया निवारण कार्यक्रमा'अंतर्गत अवघ्या दीड महिन्यात राज्यातील २०३ शाळांमधील ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास विभागाने ‘सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स’ (CACR) या सेवाभावी संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे.
तपासणी मोहिमेची आकडेवारी व स्वरूप
एकूण शाळा: २०३ (१४९ शासकीय आश्रमशाळा, ४८ अनुदानित आश्रमशाळा आणि ६ एकलव्य मॉडेल निवासी शाळा).
विद्यार्थी संख्या: ३७,९१९ मुले आणि ४१,७०५ मुली (एकूण ७९,६२४ विद्यार्थी).
पूरक आहार व उपचार: तपासणीत हिमोग्लोबिन कमी आढळलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार आणि पोषणात्मक पूरक आहार तातडीने देण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
विभागनिहाय तपासणीचा तपशील असा
नाशिक विभागात १०४ शाळांमधील ४१ हजार ४६९ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ८० शासकीय आश्रमशाळांतील ३१ हजार ३९३, २१ अनुदानित आश्रमशाळांतील ९ हजार २२७ आणि ३ एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ठाणे विभागात ८१ शाळांमधील ३३ हजार ४२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ५९ शासकीय आश्रमशाळांतील २२ हजार ५४, १९ अनुदानित आश्रमशाळांतील १० हजार ८८५ आणि ३ एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील ४८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अमरावती विभागात ८ शासकीय आश्रमशाळांमधील १ हजार ८८५ आणि ३ अनुदानित आश्रमशाळांमधील १ हजार १३ विद्यार्थ्यांची, तर नागपूर विभागात २ शासकीय आश्रमशाळांमधील ५३६ आणि ५ अनुदानित आश्रमशाळांमधील १ हजार २९५ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
"आदिवासी विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य आणि दर्जेदार शिक्षण याला विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अवघ्या दीड महिन्यात ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी झाली असून कमी हिमोग्लोबिन असलेल्या विद्यार्थ्यांवर योग्य पोषणात्मक उपाययोजना सुरू आहेत."
— लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग
ही मोहीम आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या मुलांचे आरोग्य सुदृढ करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.