जळगाव, (प्रतिनिधी) २६ ऑगस्ट - जिल्ह्यात कोणत्याही वैध परवान्याशिवाय उत्पादित केलेल्या आणि बनावट लेबल लावलेल्या सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणाऱ्या रॅकेटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. अमळनेर आणि जळगाव शहरात टाकलेल्या धाडीत एकूण १ लाख ६ हजार ३२५ रुपयांचा विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांचा साठा आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नाशिक विभागाचे सह-आयुक्त (औषधे) अशोक बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र. भा. अस्वार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दोन ठिकाणी धाडी; साहित्य जप्त
गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पंचांसमक्ष दोन ठिकाणी तपासणी केली:
अमळनेर: २३ ऑगस्ट रोजी रवींद्रनगर येथील प्रियदर्शनी रजाळे यांच्या जागेवर छापा टाकून ७२ हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जळगाव: २४ ऑगस्ट रोजी महाबळ परिसरातील राशी तळरेजा यांच्या ठिकाणाहून ३३ हजार ९३३ रुपयांची विनापरवाना उत्पादने जप्त केली.
नियम धाब्यावर बसवून उत्पादन व साठवणूक
तपासणीदरम्यान विविध प्रकारच्या लेबल आणि विनालेबल असलेल्या क्रीम्स, पावडर, जेल स्वरूपातील उत्पादने, प्रिंटेड लेबल्स, रिकाम्या बरण्या तसेच इलेक्ट्रॉनिक वजनकाटा जप्त करण्यात आला. गुणवत्ता तपासणीचे कोणतेही निकष न पाळता ही उत्पादने साठवून थेट बाजारात विकली जात असल्याचे समोर आले आहे. जप्त केलेल्या काही सौंदर्यप्रसाधनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी?
सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना ग्राहकांनी पुढील बाबींची खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन डॉ. अस्वार यांनी केले आहे:
उत्पादनावर वैध उत्पादन परवाना क्रमांक (Mfg. License No.) आहे का?
उत्पादकाचे पूर्ण नाव आणि पत्ता तपासणे.
बॅच क्रमांक (Batch No.), उत्पादन तारीख (Mfg. Date) आणि मुदत समाप्ती तारीख (Expiry Date) स्पष्ट लिहिलेली असावी.