सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिका दौऱ्यावरून वाद... न्यूयॉर्कच्या कार्यक्रमावर बंदी येणार?

Share:
Main Image
Last updated: 26-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २६ ऑगस्ट - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत हे सध्या अमेरिका, कॅनडा आणि युकेच्या दौऱ्यावर असून तेथील भारतीय डायस्पोराशी संवाद साधत आहेत. संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध स्थानिक भारतीय संस्था आणि संघटनांच्या निमंत्रणावरून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, अमेरिकेत दाखल होताच या दौऱ्यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी मोहन भागवत यांच्या नियोजित कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील कार्यक्रमावरून वाद

२९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध 'मॅडिसन स्क्वेअर गार्डन' येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोहन भागवत अमेरिकेत पोहोचल्यानंतर अवघ्या काही तासांतच महापौर झोहरान ममदानी यांनी या कार्यक्रमावर टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना ममदानी म्हणाले, "मी या कार्यक्रमाचे अजिबात समर्थन करत नाही. परंतु, हा एक खासगी कार्यक्रम असल्याने यावर बंदी घालण्याचे कायदेशीर अधिकार शहराच्या प्रशासनाला आहेत का, याची मला कल्पना नाही. एका विशिष्ट घटकाला वगळण्याच्या विचारावर आधारित असलेल्या कोणत्याही चळवळीचा उदय होणे हे त्रासदायक आहे."

Advertisement

"मी या चळवळीच्या तीव्र विरोधात"

आपल्या भूमिकेची स्पष्टता देताना महापौर ममदानी यांनी आपल्या भारतीय मुळांचा उल्लेख केला. "मी या शहराचा पहिला भारतीय-अमेरिकन महापौर म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. माझ्या कुटुंबाने दिलेल्या शिकवणुकीनुसार भारत हे एक विविधतेने नटलेले, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आहे जे प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचा सन्मान करते," असे सांगत त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "केवळ एक भारतीय-अमेरिकन म्हणून नव्हे, तर न्यूयॉर्क शहराचा महापौर म्हणूनही मी या चळवळीच्या तीव्र विरोधात आहे. हे शहर जात, धर्म, रंग किंवा श्रद्धेचा भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करते."

दौऱ्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष

संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाच्या निमित्ताने भागवत हे परदेशातील भारतीय समुदायाशी थेट संवाद साधत आहेत. मात्र, न्यूयॉर्कच्या महापौरांनी घेतलेल्या या आक्रमक भुमिकेनंतर या दौऱ्याला राजकीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे वळण मिळाले असून, या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

Comments

No comments yet.