अक्षय काळे, (मुंबई) २६ ऑगस्ट - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेली 'औधष निरीक्षक' (Drug Inspector) पदाची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. पेपरलीक झाल्याचे पुरावे समोर आल्यानंतर आणि तपास यंत्रणांच्या निष्पन्न अहवालानंतर आयोगाने हा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आयोगाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
"एका विद्यार्थ्याकडेच पेपर असल्याचे स्पष्टीकरण अमान्य"
पेपर रद्द झाल्याच्या निर्णयानंतर पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवार यांनी आयोगाच्या स्पष्टीकरणावर ताशेरे ओढले. "आम्ही पुराव्यासकट हा मुद्दा मांडला आणि पाठपुरावा केला, तेव्हा कुठे तपासात पेपरलीकचे तथ्य समोर आले. मात्र, केवळ एकाच विद्यार्थ्याकडे पेपर होता, हे आयोगाचे स्पष्टीकरण अजिबात मान्य करण्यासारखे नाही. राज्यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेटमार्फत ४० ते ४० लाख रुपयांना हा पेपर विकला गेला आहे, ही वस्तुस्थिती असून आयोगालाही याची पूर्ण कल्पना आहे," असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा
एमपीएससीसारख्या सर्वोच्च संस्थेचा पेपर लीक होणे ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, "आयोगाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता संपूर्ण चौकशी अहवाल तातडीने सार्वजनिक करावा. आम्ही दिलेल्या संशयित एजंट्सच्या नावांवर काय कारवाई झाली? या घोटाळ्यात आयोगातील कोणी सहभागी आहे का? कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? या सर्वांचा खुलासा झाला पाहिजे. आयोगाने हे दडपण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही शांत बसणार नाही."
या संपूर्ण प्रकरणी एमपीएससी अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत सरकारने अध्यक्षपदी स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची नेमणूक करावी, असे ते म्हणाले. तसेच, राज्य सरकारने आणि सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी या विषयावर मौन सोडून जनतेसमोर खरी वस्तुस्थिती मांडावी, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली आहे.