अक्षय काळे, (मुंबई) २५ ऑगस्ट - भारतातील ‘वनतारा’ या संस्थेने इंडोनेशिया सरकारसोबत वन्यजीव आरोग्य आणि संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय करार केला आहे. या भागीदारीअंतर्गत इंडोनेशियामध्ये १० ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ (मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णालये) सुरू करण्यात येणार असून, प्रसिद्ध ‘वे कंबास एलिफंट हॉस्पिटल’चा विस्तार आणि आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून अद्ययावतीकरण केले जाईल.
'वे कंबास'चे अद्ययावतीकरण अन् विशेष प्रशिक्षण
हत्तींसाठी आधुनिक केंद्र: अद्ययावतीकरणानंतर वे कंबास रुग्णालयाचे ‘एलिफंट ट्रीटमेंट अँड केअर सेंटर’ म्हणून रुपांतर केले जाईल.
१६०+ हत्तींना लाभ: हे केंद्र मानवी देखरेखीखाली असलेल्या ६२ सुमात्रन हत्तींसह जवळच्या जंगलांमधील सुमारे १०० जंगली सुमात्रन हत्तींच्या उपचारासाठी मदत करेल.
अधिवासातच उपचार: गरज भासल्यास १० मोबाइल रुग्णालयांद्वारे वन्यजीवांना थेट त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच तातडीची वैद्यकीय मदत पुरवली जाईल.
कौशल्य विकास: हत्तींची देखभाल करणारे कर्मचारी आणि स्थानिक पशुवैद्यकांना वनतारातर्फे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
इंडोनेशिया सरकारकडेच मालकी
या उपक्रमासाठी वनतारा तज्ज्ञ पशुवैद्यकीय सेवा, तांत्रिक सहकार्य, पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण पुरवणार आहे. सर्व सुविधांची मालकी आणि संचालन हे इंडोनेशिया सरकारकडेच राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
इंडोनेशियाचे वनमंत्री राजा जूली अँटोनी यांनी या कराराचे स्वागत करत वन्यजीव संरक्षण क्षमता मजबूत होईल असे म्हटले आहे. तर, अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या वनताराचे सीईओ विवान करानी यांनी, या भागीदारीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीव संरक्षणाचा अनुभव परस्पर सामायिक करता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.