भीषण वास्तव... वेतनाअभावी उपचार रखडले... बाजार समिती लेखापालाचा तडफडून मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 24-Aug-2026

जालना, (प्रतिनिधी) २४ ऑगस्ट - गेल्या साडेचार वर्षांपासून थकीत असलेल्या वेतनामुळे वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळून आष्टी (तालुका परतूर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे लेखापाल केशव बनसोडे (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी (२२ ऑगस्ट) पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बनसोडे मागील सहा महिन्यांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते.

६७ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

आष्टी बाजार समितीच्या अखत्यारीत ४२ गावे येतात. मात्र, समितीचे उत्पन्न कमी असल्याचे सांगत येथील ७ कर्मचाऱ्यांचे वेतन तब्बल ६७ महिन्यांपासून थकले आहे. वेतनाअभावी आर्थिक चणचण निर्माण झाल्याने केशव बनसोडे यांना वेळेवर उपचार घेता आले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Advertisement

१५ दिवसांत थकीत वेतन देण्याचे सभापतींचे आश्वासन

बाजार समितीचे उत्पन्न अल्प असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याचे सांगत, सभापती शत्रुघ्न कणसे यांनी बनसोडे कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पुढील १५ दिवसांत सर्व कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देण्याचा शर्थीने प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'सीटू'चा तीव्र संताप अन् पाठपुरावा

या घटनेवर 'सीटू'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वेतनाअभावी कर्मचाऱ्याचा मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी असून सरकारने या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. मृत केशव बनसोडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी सीटू (CITU) संघटना पूर्ण ताकदीने पाठपुरावा करून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

No comments yet.