नाशिक, प्रतिनिधी (२४ ऑगस्ट २०२६) -
राहत्या घराच्या गॅलरीतून अचानक खाली उडी घेतल्याने एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सिडकोतील खुटवडनगर परिसरातील पोलीस चौकीसमोर घडली असून, आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत महिलेचे नाव: अलकाबाई काळू शिरसाठ (वय ६५, रा. समर्थ हाईट्स, पोलीस चौकीसमोर, खुटवडनगर, नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे.
घटना कशी घडली?
अलकाबाई यांनी रविवारी (दि. २३) अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घराच्या गॅलरीतून थेट जमिनीवर उडी मारली.
अचानक घडलेल्या या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचा पुतण्या सुमेरसिंग शिरसाठ यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नसून, अंबड पोलीस ठाण्याचे हवालदार आवारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
महिलेच्या गळ्यातील पोत चोरली
शहर सिटी लिंक बसमध्ये चढत असतांना प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हातोहात लांबविली. ही घटना पंचवटी कारंजा भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंजली लक्ष्मण मोटे (रा.अंबड लिंकरोड कामटवाडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोटे शनिवारी (दि.२२) पंचवटी भागात गेल्या होत्या. सायंकाळी त्या परतीच्या प्रवासासाठी पंचवटी कारंजा येथील बसथांब्यावर थांबल्या असता ही घटना घडली.
निमाणी ते उत्तमनगर बस मध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे २० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. हा प्रकार मोटे या घरी परतल्यानंतर उघडकीस आला. हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.