६ लाखाहून अधिक मते मिळवणाऱ्या खासदाराला काहीच किंमत नाही? तब्बल दोन वर्षांनी मिळाले बैठकीचे निमंत्रण...

Share:
Main Image
Last updated: 24-Aug-2026

 

 

मनोहर शिंदे, नाशिक (२४ ऑगस्ट २०२६) -

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जनतेने कौल देत ६,१६,७२९ मतांचा डोंगर रचून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे यांना १,६२,००१ मतांच्या दणदणीत फरकाने विजयी केले. मात्र, तब्बल ६ लाख ६ हजारांहून अधिक मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या लोकप्रतिनिधीला मागील दोन वर्षांत कुंभमेळ्याच्या एकाही प्रशासकीय बैठकीचे आमंत्रण नव्हते!

तब्बल दोन वर्षांनंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या आढावा बैठकीचे अधिकृत आमंत्रण खासदार वाजेंना मिळाले. जुन्या जिल्हा परिषद भवनात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत खासदार राजाभाऊ वाजेंनी उपस्थित राहून प्रशासकीय अनास्थेवर आणि आरोग्य यंत्रणेच्या त्रुटींवर जोरदार प्रहार केला.

खासदार राजाभाऊ वाजेंच्या प्रमुख ६ मागण्या:

 पर्वणीनंतरही आरोग्य यंत्रणा सुरू ठेवा:
कुंभमेळ्यातील पर्वणी संपल्यानंतर गर्दीमुळे संसर्गजन्य व जलजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पर्वणीनंतरही वैद्यकीय पथके, तपासणी केंद्रे व रुग्णालयीन सुविधा सुरू ठेवाव्यात.

 महापालिका रुग्णालयांत शवविच्छेदन सुविधा:
सध्या केवळ जिल्हा रुग्णालयावर शवविच्छेदनाचा (Post-Mortem) ताण येतो. महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही ही सुविधा तातडीने सुरू करावी.

Advertisement

खासगी रुग्णालयांत मोफत / कॅशलेस उपचार:
'आयुष्मान भारत' व इतर सरकारी योजनांद्वारे भाविकांना खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सुविधा द्यावी, जेणेकरून शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी होईल.

निराधारांसाठी स्वतंत्र पुनर्वसन केंद्र:
गर्दीत वयोवृद्ध किंवा मानसिक रुग्णांना सोडून देण्याचे प्रमाण वाढते; त्यांच्यासाठी निवारा, तपासणी व समुपदेशनाची स्वतंत्र व्यवस्था उभारावी.

विभागीय संदर्भ रुग्णालय ५०० खाटांचे करा:
सध्या १०० ते १०५ खाटांचे असलेले हे रुग्णालय नाशिक व उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ते टप्प्याटप्प्याने ५०० खाटांचे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय करावे.

प्रलंबित डायलिसिस व CT स्कॅन सुरू करा:
मागील १५ महिन्यांपासून रखडलेल्या डायलिसिस मशीन प्रस्तावाला तातडीने तांत्रिक मान्यता द्यावी, बंद पडलेले CT स्कॅन सुरू करावे व रिक्त पदे त्वरित भरावीत.

आमंत्रणामागे प्रशासकीय लाचारी की मित्राचे प्रेम?

मागील दोन वर्षे ६ लाखांहून अधिक मते मिळालेल्या लोकप्रतिनिधीला कुंभमेळ्याच्या नियोजनापासून दूर ठेवणाऱ्या प्रशासनाने अचानक पाठवलेल्या निमंत्रणावरून बैठकीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या.

खासदार वाजेंचा वाढता लोकसंपर्क पाहून प्रशासनाला वेळेत जाग आली, की आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्यातील जुन्या व घट्ट मैत्रीमुळे हे निमंत्रण मिळाले? असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

 "कुंभमेळ्यासाठी उभारली जाणारी आरोग्य व्यवस्था ही केवळ पर्वणीपुरती मर्यादित न ठेवता, पर्वणीनंतर उद्भवणारे संसर्गजन्य आजार, निराधार वयोवृद्ध व मानसिक रुग्णांचा प्रश्न आणि शासकीय रुग्णालयांवरील संभाव्य ताण लक्षात घेऊन आतापासूनच सर्वंकष नियोजन करणे आवश्यक आहे."

— राजाभाऊ वाजे (खासदार, नाशिक)

Comments

No comments yet.