केशव खेडकर, नाशिक (२४ ऑगस्ट २०२६) -
लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली गुजरातच्या वलसाड येथील एका असहाय्य महिलेची आर्थिक फसवणूक करत नाशिकच्या अमरधाममध्ये अघोरी पूजा करणाऱ्या भोंदू बाबाची नाशिक पोलिसांनी पोलखोल केली आहे. नाशिकच्या फुलेनगर भागातील भोंदू बाबा विशाल खंडागळे आणि या कटात सामील असलेला पीडित महिलेचा प्रियकर जीतू पवार या दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २६ ऑगस्टपर्यंत (४ दिवस) पोलिस कोठडी सुनावली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) तत्परतेमुळे शुक्रवारी भद्रकाली पोलिस ठाण्यात 'जादूटोणा विरोधी कायद्यान्वये' गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लग्नाचे आमिष, अघोरी पूजा आणि ७७ हजारांची फसवणूक
गुजरातच्या वलसाड येथील पीडित महिला अत्यंत गरिबीत व बिकट परिस्थितीत दिवस काढत आहे. तिचे लग्न जमवून देतो अशी भूलथाप देऊन भोंदू विशाल खंडागळे याने नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत अघोरी पूजा मांडली आणि तिच्याकडून तब्बल ७७ हजार रुपये उकळले. या संपूर्ण प्रकारात पीडितेचा प्रियकर जीतू पवार हादेखील भोंदू बाबासोबत सहभागी असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पीडितेच्या पुनर्वसनासाठी 'नाशिककर' धावले
भोंदूगिरीचा बळी ठरलेली ही महिला अत्यंत निराधार असल्याने तिच्या निवाऱ्याचा आणि पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. महा. ‘अंनिस’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे:
निवाऱ्याची सोय:
हिरावाडी येथील ‘वात्सल्य वृद्धाश्रम’ आणि पंचवटी येथील ‘माणुसकी बेघर व पुनर्वसन केंद्र’ यांनी पीडित महिलेच्या राहण्याची व सर्व जबाबदारी स्वीकारली आहे.
रोजगाराची संधी:
महिला व बालकल्याण विभागामार्फत तिला योग्य ते कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
अंनिसचे नागरिकांना आवाहन
"या भोंदू बाबाने अशाच प्रकारे आणखी काही भक्तांना जाळ्यात ओढून फसवणूक केली असल्याची दाट शक्यता आहे. जर कोणाची अशी फसवणूक झाली असल्यास त्यांनी न घाबरता महा. अंनिसशी अथवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा."
— महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) (संपर्क: कृष्णा चांदगुडे – ९८२२६३०३७८)