केशव खेडकर, नाशिक (२४ ऑगस्ट २०२६) -
सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक पारदर्शक, सुसूत्र आणि विश्वासार्ह करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी धुळे आणि नाशिक जिल्ह्याचा वादळी दौरा केला. या पाहणीदरम्यान रुग्णालयांतील अस्वच्छता, रुग्णांची हेळसांड, प्रशासकीय ढिसाळपणा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर व कंत्राटदारांवर आरोग्यमंत्र्यांनी थेट कारवाईचा बडगा उभारला आहे.
तसेच, "रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही," असा कडक इशारा देत त्यांनी राज्यभरातील गावापासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’ पुरवण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे.
१० प्रमुख प्रकरणांत कडक कारवाईचे निर्देश
सिव्हिल सर्जन (धुळे):
रुग्णालयातील अस्वच्छता, कॅथलॅबचे असमाधानकारक काम आणि MJPJAY योजनेतील त्रुटींमुळे तात्काळ कारवाईचे आदेश.
वैद्यकीय अधीक्षक (मालेगाव सामान्य रुग्णालय):
अस्वच्छता आणि रुग्णांच्या हेळसांडीप्रकरणी प्रशासकीय कारवाईचे निर्देश.
वैद्यकीय अधीक्षक (नामपूर):
कामकाजातील दुर्लक्ष, MJPJAY मधील निकृष्ट कामगिरी व रुग्ण कल्याण समितीशी समन्वयाचा अभाव याप्रकरणी कारवाई.
वैद्यकीय अधिकारी (जायखेडा/निताने) व THO (बागलाण):
जन आरोग्य समितीच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सखोल चौकशी व कठोर कारवाईचे आदेश.
तालुका आरोग्य अधिकारी (सुरगाणा):
बोगस डॉक्टरांवर कारवाई न करणे व सहनियंत्रणात असमर्थ ठरल्याने कडक कारवाईचे निर्देश.
भोजन कंत्राटदार (सुरगाणा ग्रामीण रुग्णालय):
रुग्णांना निकृष्ट व अस्वच्छ जेवण दिल्याने कंत्राट तात्काळ रद्द करण्याचे आदेश.
प्राथमिक आरोग्य केंद्र (पांगरणे, सुरगाणा):
कर्त्यव्यात कसूर आणि रुग्णसेवेतील हलगर्जीपणाप्रकरणी प्रशासकीय कारवाई.
वरखेडा व तळेगाव (दिंडोरी) वैद्यकीय अधिकारी:
रुग्णाच्या मृत्यू संदर्भातील हलगर्जीपणाची सखोल चौकशी करून कारवाईचे निर्देश.
जिल्हा आरोग्य अधिकारी (नाशिक):
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न होणे व 'आपला दवाखाना' औषध तुटवडा चौकशीचे निर्देश.
वैद्यकीय अधिकारी (बिटको रुग्णालय, नाशिक मनपा):
जनकल्याण समिती बैठकीतील अनियमिततेबाबत चौकशी व कारवाईचे आदेश.
सुरगाणा दुर्गम भागातील आरोग्य सुविधा बळकट करणार
सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करताना आरोग्यमंत्र्यांनी तेथील नवीन ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे उर्वरित काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
सोनोग्राफी व तज्ज्ञ डॉक्टर - सुरगाण्यात सोनोग्राफी सुविधा सुरू करणे, स्त्रीरोग, बालरोग व भूलतज्ज्ञ भरणे.
अतिरिक्त रुग्णवाहिका - दुर्गम भागासाठी १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवेत अतिरिक्त गाड्यांची सोय.
भोजन दर्जा - रुग्णांच्या जेवणाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश.
गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’
सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णालयांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची स्पष्ट मानके निश्चित केली आहेत:
* निदानात्मक चाचण्या (३०८ प्रकार):
ग्रामीण रुग्णालयात ७६, १०० खाटांच्या रुग्णालयात १ंता आणि जिल्हा रुग्णालयात १२२ प्रकारच्या चाचण्या उपलब्ध असतील.
* रेडिओलॉजी सुविधा:
१०० खाटांवरील रुग्णालयांत सीटी स्कॅन (CT-Scan) आणि जिल्हा रुग्णालयांत एमआरआय (MRI) सेवा निश्चित करण्यात आल्या आहेत.
* मनुष्यबळ बळकटीकरण:
राष्ट्रीय आरोग्य अभियानातून १११ सुपर स्पेशालिस्ट, १,५१९ स्पेशालिस्ट, २,९१९ वैद्यकीय अधिकारी व ११,५७१ स्टाफ नर्ससह विविध पदे उपलब्ध करून दिली जात आहेत.
"नागरिकाला कोणत्या रुग्णालयात कोणती सेवा मिळणार, कोणते तज्ज्ञ उपलब्ध असतील याची स्पष्ट माहिती असणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेतील पारदर्शकता वाढून नागरिकांचा शासकीय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल."
— प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य)