अक्षय काळे, (मुंबई) २३ ऑगस्ट - धार्मिक कार्यक्रम, उत्सव आणि भंडाऱ्यांमध्ये वाटल्या जाणाऱ्या महाप्रसादाबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. भाविकांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेता आता महाप्रसाद आणि भंडाऱ्याच्या आयोजकांसाठी 'एफडीए'ची नोंदणी किंवा अधिकृत परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनापरवाना महाप्रसादाचे आयोजन केल्यास आयोजकांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
आयोजकांसाठी FDA च्या महत्त्वाच्या अटी व नियम:
अधिकृत परवाना अनिवार्य: महाप्रसाद किंवा भंडाऱ्याचे आयोजन करण्यापूर्वी FDA कडे नोंदणी करून परवाना मिळवणे बंधनकारक असेल.
पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी RO पाणी: अन्न शिजवण्यासाठी तसेच भाविकांना पिण्यासाठी केवळ 'आरओ' (RO) पाण्याच्या वापराची अट घालण्यात आली आहे.
स्वच्छता आणि सुरक्षा नियम: स्वयंपाक बनवणाऱ्या आणि महाप्रसाद वाटप करणाऱ्या स्वयंसेवकांनी डोक्यावर टोपी, हातमोजे (Gloves) आणि मास्क घालणे अनिवार्य राहील.
शिळ्या अन्नावर बंदी: प्रसादासाठी वापरले जाणारे अन्न ताजे आणि दर्जेदार असावे. शिळे अन्न वाटप केल्याचे आढळल्यास आयोजकांवर कठोर कारवाई केली जाईल.
अन्नाचा दर्जेदारपणा आणि आरोग्याची स्वच्छता राखण्यासाठी एफडीएने हे पाऊल उचलले असून, सर्व सार्वजनिक मंडळे आणि उत्सव आयोजकांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे