मुंबई, (प्रतिनिधी) २३ ऑगस्ट - भिवंडी-कल्याण बायपासवर आज दुपारी १ वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ट्रकचालकाने दाखवलेले प्रसंगावधान आणि त्याच वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
चालकाच्या हे लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत ट्रक तत्काळ रस्त्याच्या कडेला घेतला, ज्यामुळे महामार्गावरील मोठा अपघात टळला. याचदरम्यान नाशिकहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास ही घटना आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला ताफा थांबवून स्वतः घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी घाबरलेल्या ट्रकचालकाला धीर देत सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या, तसेच आग नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक आपत्कालीन यंत्रणेशी तातडीने संपर्क साधला. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून त्यांनी लागलीच वाहतूक पोलिसांशी संपर्क साधून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले.
प्रशासकीय चौकटीच्या पलीकडे जाऊन एका जबाबदार लोकप्रतिनिधीच्या नात्याने मदतीला धावून जाण्याच्या मंत्री महाजन यांच्या या कृतीमुळे त्यांच्या 'संकटमोचक' प्रतिमेचा पुनरुच्चार झाला आहे. महाजन यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे आणि चालकाच्या प्रसंगावधानाने ही मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.