तासनतास रांगेत उभे राहण्याचे दिवस संपले... रेल्वेचे तिकीट या मोबाईल ॲपवर लगेच मिळवा...

Share:
Main Image
Last updated: 23-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) २३ ऑगस्ट - भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या डिजिटल क्रांतीला देशाभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेच्या ‘रेलवन ॲप’ (RailOne App) डाऊनलोड्सचा आकडा तब्बल ४.७६ कोटींवर पोहोचला असून, या ॲपद्वारे दररोज सरासरी १० लाख तिकिटांचे बुकिंग केले जात आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

एकाच ॲपवर सर्व सेवा उपलब्ध

आरक्षित तसेच अनारक्षित तिकिटांची डिजिटल खरेदी वाढवण्यासाठी रेल्वेने १ जुलै २०२५ रोजी ‘रेलवन ॲप’ लाँच केले होते. या एकाच ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना खालील सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत:

आरक्षित (Reserved) व अनारक्षित (Unreserved) तिकीट बुकिंग

प्लॅटफॉर्म तिकीट

गाडीची चौकशी व रिअल-टाइम लोकेशन

पीएनआर (PNR) स्टेटस चौकशी

'रेलमदद' (RailMadad) तक्रार व मदत सेवा

२ ऑगस्ट २०२६ पर्यंतची थक्क करणारी आकडेवारी:

एकूण ॲप डाऊनलोड्स: ४.७६ कोटी

दररोजची सरासरी तिकिटे: १० लाख

दररोजची आरक्षित तिकिटे: २.७९ लाख

दररोजची अनारक्षित तिकिटे: ७.२४ लाख

Advertisement

८९% आरक्षित तिकिटे आता 'ऑनलाइन'!

रेल्वेच्या तिकिटिंग सिस्टीममध्ये गेल्या दशकभरात अमुलाग्र बदल झाला आहे.

२०१३-१४ मध्ये केवळ ४९% आरक्षित तिकिटे ऑनलाइन बुक केली जात होती.

सध्या हे प्रमाण वाढून ८९% वर पोहोचले आहे.

याशिवाय, डिजिटल माध्यमांमुळे अनारक्षित (General) तिकिटांचे ऑनलाइन बुकिंगही ३९% पर्यंत वाढले आहे.

'NTES' ॲपचे ४.६६ कोटींपेक्षा जास्त युजर्स

गाड्यांच्या अचूक वेळेची माहिती देणाऱ्या 'राष्ट्रीय रेल्वे चौकशी प्रणाली' (NTES) मोबाईल ॲपलाही प्रवाशांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. १ ऑगस्ट २०२६ पर्यंत या ॲपचे:

अँड्रॉइडवर (Android): ४.५ कोटींपेक्षा जास्त डाऊनलोड्स

आयओएसवर (iOS): १६ लाख डाऊनलोड्स

हे ॲप एकाच वेळी ८०,००० युजर्सना सेवा देऊ शकते आणि दररोज ६ कोटींपेक्षा जास्त चौकशा (Inquiries) पूर्ण करते. यामुळे रेल्वे स्थानकांनावरील चौकशी केंद्रांवरील रांगा आणि गर्दी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

ट्रेन रद्द झाल्यास 'ऑटोमॅटिक रिफंड'

रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की, एखादी गाडी रद्द झाल्यास 'नेक्स्ट जनरेशन ई-तिकिटिंग' (NGET) प्रणालीद्वारे ऑनलाइन तिकीट काढलेल्या प्रवाशांना थेट त्यांच्या बँक खात्यात स्वयंचलित (Automatic) परतावा जमा होतो.

महत्त्वाची नोंद: हा ऑटोमॅटिक रिफंड फक्त ऑनलाइन ई-तिकिटांसाठीच उपलब्ध आहे. रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरून (PRS Counter) घेतलेल्या तिकिटांचा परतावा मिळवण्यासाठी प्रवाशांना काउंटरलाच भेट द्यावी लागते.

Comments

No comments yet.