पुणे, (प्रतिनिधी) २२ ऑगस्ट - कॉंग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी पुण्यामध्ये 'छात्रों की गूंज' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विशेषतः तरुणींनी तुफान गर्दी केली होती. कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी काही विद्यार्थिनींना व्यासपीठावर बोलावून त्यांचे अनुभव ऐकले. यावेळी एका पुणेकर तरुणीने तिच्या बालपणीचा महिला सुरक्षेशी संबंधित हादरवणारा अनुभव सांगितला, तो ऐकून राहुल गांधींसह उपस्थित सर्व 'Gen Z' तरुण-तरुणी स्तब्ध झाले.
स्टेजवर तरुणीने मांडली अंगावर शहारे आणणारी व्यथा:
त्या तरुणीने सांगितले, "आपण जेव्हा महिला सुरक्षेचा विचार करतो, तेव्हा बातम्या वाचणे आणि प्रत्यक्षात तो प्रसंग अनुभवणे यात खूप मोठा फरक असतो. मी ८ वीत असताना गावातील शाळेतून घरी जात होते. त्यावेळी गावातीलच तीन विवाहित आणि दारू प्यालेल्या पुरुषांनी मला व माझ्या मैत्रिणीला घेरले, आमची छेड काढली आणि कमेंट्स केल्या. आम्ही घाबरून पळून गेलो आणि घरी वडिलांना सांगितले. वडिलांच्या सांगण्यावरून आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी आरोपींना बेदम मारहाण करत कारवाई केली."
राहुल गांधींचा मनुस्मृती आणि महिला सुरक्षेवर घणाघात:
तरुणीचे हे अनुभव ऐकल्यानंतर राहुल गांधी यांनी महिलांच्या सुरक्षेवर आणि समाजातील मानसिकतेवर भाष्य केले.
सुरक्षेचा खर्च व अत्याचार: "देशात दररोज १०० पैकी ८० टक्के महिलांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारे अत्याचार होतो. ५० टक्के महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी शिक्षण किंवा नोकरी नाकारतात. प्रत्येक महिलेला स्वतःच्या सुरक्षेसाठी महिन्याला ७,५०० रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो," असा दावा राहुल गांधींनी केला.
मनुस्मृतीवर टीका: "महिला ही या देशाची ७० कोटींची सर्वात मोठी ताकद आहे. मनुस्मृतीमधून स्त्रियांबाबत चुकीचा अर्थ लावला गेला असून, महिलांनी कधीही स्वतंत्र राहू नये असा त्यामागील डाव होता. महिलांवर कोणत्याही पुरुषाचा अधिकार नाही. 'पिंजरा तोडा' हीच या कार्यक्रमाची संकल्पना आहे," असे प्रतिपादन राहुल गांधींनी केले.
शिक्षणात आणि रोजगारात मुलींवर होणारा भेदभाव थांबवून त्यांना समान संधी मिळायला हवी, असा संदेश राहुल गांधींनी या संवादाच्या माध्यमातून दिला.
बघा या कार्यक्रमाचा हा व्हिडीओ