अक्षय काळे, (मुंबई) २२ ऑगस्ट - पारंपरिक केमोथेरपीमुळे होणाऱ्या तीव्र परिणामांपासून कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी' (IASST) चे डॉ. असिस बाला आणि 'आयआयटी गुवाहाटी'चे डॉ. के. पी. भाबक यांच्या संयुक्त संशोधनातून 'RK-251' हे प्रगत आणि आधुनिक कर्करोगविरोधी औषध विकसित करण्यात आले आहे. हे औषध शरीरातील निरोगी पेशींना कोणतीही हानी न पोहोचवता केवळ कर्करोगाच्या पेशींमध्येच सक्रिय होऊन कार्य करते.
नवीन औषधाची वैशिष्ट्ये आणि कार्यपद्धती:
टारगेटेड ॲक्शन: कर्करोगाच्या पेशींमध्ये असलेल्या 'रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिज' (ROS) या रेणूंच्या संपर्कात आल्यावरच हे औषध सक्रिय होते.
दुष्परिणाममुक्त उपचार: औषध सक्रिय झाल्यानंतर त्यातून ‘NBDHEX’ हे संमिश्र मुक्त होते, जे कर्करोग पेशींना मारण्याचे काम करते. निरोगी पेशींमध्ये हे औषध निष्क्रिय राहत असल्याने रुग्णाला केमोथेरपीसारख्या वेदनादायी दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार नाही.
ट्रिपल-नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी: प्रयोगात्मक (Pre-clinical) अभ्यासात हे औषध अत्यंत आक्रमक समजल्या जाणाऱ्या 'ट्रिपल-नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर'च्या पेशी नष्ट करण्यात यशस्वी ठरले आहे.
सुरक्षिततेची तपासणी: 'झेब्राफिश'च्या भ्रूणांवर केलेल्या चाचण्यांमध्ये या औषधाचा कोणताही विषारी किंवा घातक परिणाम दिसून आला नाही.
हे महत्त्वपूर्ण संशोधन 'ACS - जर्नल ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री' या जागतिक दर्जाच्या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. मानवी शरीरावर याच्या प्रत्यक्ष चाचण्या (Clinical Trials) घेण्यापूर्वी आणखी काही टप्प्यांतील अभ्यास बाकी असला, तरी भविष्यात हे औषध केमोथेरपीला एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरेल असा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.