नाशिक, (प्रतिनिधी) २१ ऑगस्ट - पुढील दोन आठवड्यांत (४ सप्टेंबर - गोकुळ अष्टमीपर्यंत) संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे (IMD) निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. 'एल-निनो'च्या प्रभावामुळे ही स्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर न राहता पिकांना तातडीने सिंचन देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हानिहाय पावसाचा अंदाज (पुढील २ आठवडे):
मध्यम ते मुसळधार पाऊस (१२ जिल्हे):
ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या १२ जिल्ह्यांत सरासरीइतक्या मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
किरकोळ पाऊस / ओढ (२४ जिल्हे):
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यासह संपूर्ण मराठवाडा आणि अमरावती, बुलढाणा, वर्धा, अकोला, वाशीम, यवतमाळ या २४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी म्हणजे केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाच्या सरी (पहाळे टाईप) पडू शकतात.
शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला:
पाऊस पडेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा असूनही पिकांना पाणी दिलेले नाही, त्यामुळे खरीप पिके ताणाखाली आली आहेत. मात्र, येत्या दोन आठवड्यांत मोठ्या पावसाची शक्यता नसल्यामुळे शेतकऱ्यांनी विनाविलंब पिकांना पाणी द्यावे. ज्या शेतकऱ्यांनी आधीच सिंचन केले आहे, त्यांची ऊस, मका, सोयाबीन, भुईमूग आणि भाजीपाल्याची पिके उत्तम स्थितीत आहेत.
सप्टेंबरमध्ये 'एल-निनो'चा प्रभाव वाढणार?
जून-जुलैमध्ये व्यक्त करण्यात आलेली भीती आता खरी ठरताना दिसत असून, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये एल-निनोचा प्रभाव अधिक जाणवत आहे. मान्सूनच्या उर्वरित काळात, म्हणजेच सप्टेंबर महिन्यातही एल-निनोच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परतीचा पाऊस आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाही सरासरीपेक्षा कमीच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.