जळगाव, (प्रतिनिधी) २१ ऑगस्ट - जळगाव जिल्ह्यात औद्योगिक विकासाला मोठी गती मिळाली असून, उद्योग आयुक्तालय व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित 'जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६' मध्ये तब्बल १,४४५.६८ कोटी रुपयांच्या १०२ सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यातून सुमारे ४,७१६ थेट रोजगारांची निर्मिती होणार आहे. उद्योग उभारणीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, मात्र उद्योजकांनी स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
एमआयडीसी परिसरातील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे ही परिषद उत्साहात पार पडली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्याला लवकरच 'डी प्लस' दर्जा :
जळगाव जिल्ह्याला विदर्भाच्या धर्तीवर औद्योगिक सवलतींसाठी ‘डी प्लस’ दर्जा देण्यास मान्यता मिळाली आहे. परिषदेदरम्यानच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी थेट फोनवरून संपर्क साधत यासंदर्भातील शासन निर्णय (GR) तातडीने काढण्याची मागणी केली. यावर येत्या मंगळवारी बैठक घेऊन जीआर काढण्याची ग्वाही उद्योगमंत्र्यांनी दिली.
गुंतवणूक परिषदेतील प्रमुख ठळक मुद्दे :
१००० भूखंड सज्ज : चाळीसगाव एमआयडीसीत १२३, जामनेरमध्ये ५७३ आणि भुसावळमध्ये ३०४ असे एकूण एक हजार औद्योगिक भूखंड नवीन उद्योगांसाठी उपलब्ध आहेत.
उद्योग भवन लवकरच : एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या उद्योग भवनाचे ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झाले असून, ते लवकरच कार्यान्वित होईल.
निर्यात संधी : केंद्राच्या १२० निर्यातक्षम जिल्ह्यांच्या यादीत जळगावचा समावेश झाल्याने केळी, कापूस या स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळणार आहे.
स्थलांतर थांबणार : जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाल्यास स्थानिक तरुणांचे पुणे, मुंबई, नाशिककडे होणारे स्थलांतर थांबेल, असा विश्वास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केला.
प्रशासकीय सहकार्य : नवउद्योजकांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेत उद्योजकता विकास कक्ष सुरू करण्यात येणार असून, महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून दिली जाईल, अशी माहिती सीईओ करिष्मा नायर यांनी दिली.
या परिषदेत करार केलेल्या १०२ उद्योजकांना सामंजस्य करारांचे वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. मागील परिषदेतील ८० टक्के करारांची उद्दिष्टपूर्ती झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने यांनी केले.