अवयव प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदत हवीय? ७९८ गरजूंनी घेतला लाभ... तुम्हीही घ्या...

Share:
Main Image
Last updated: 21-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) २१ ऑगस्ट - यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस आणि हृदय यांसारखे महत्त्वाचे अवयव निकामी झालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी' संजीवनी ठरत आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात राज्यातील ७९८ गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी एकूण १५ कोटी ७९ लाख ६६ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून देण्यात आली.

उपचारनिहाय वितरित आर्थिक मदत (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६):

मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण: ६१७ रुग्णांना ₹१२ कोटी २३ लाख ६६ हजार

यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण: १६२ रुग्णांना ₹३ कोटी २१ लाख ५० हजार

हृदय प्रत्यारोपण: १६ रुग्णांना ₹२८ लाख ५० हजार

फुप्फुस प्रत्यारोपण: ०३ रुग्णांना ₹६ लाख

Advertisement

जिल्हास्तरीय कक्ष व ऑनलाइन प्रणालीमुळे प्रक्रिया गतिमान:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया अधिक रुग्णकेंद्रित व पारदर्शक करण्यात आली आहे. रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत जिल्हास्तरीय कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

रुग्णालयांमार्फत थेट अर्ज सादर करण्याची सुविधा:

नव्या अद्ययावत ऑनलाइन प्रणालीनुसार, आता वैद्यकीय मदतीचा अर्ज रुग्णाला स्वतः सादर करावा लागत नाही; तर योजनेशी संलग्न असलेले रुग्णालयच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून थेट ऑनलाईन अर्ज सादर करते. यामुळे अर्जाच्या मंजुरीची प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण होऊन रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होत आहे.

मदतीसाठी टोल-फ्री क्रमांक:

आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या गरजू रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी 1800 123 2211 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

Comments

No comments yet.