अक्षय काळे, (मुंबई) २१ ऑगस्ट - गणेशोत्सव हा राज्याचा ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व मंत्रालयीन विभाग, शासकीय कार्यालये आणि महामंडळांनी विविध सांस्कृतिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत. गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीनेही या वर्षी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत.
राज्य महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उपक्रम:
दीड कोटींची पारितोषिके: राज्यातील ४८० उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर एकूण ₹१.५ कोटींची पारितोषिके दिली जातील.
देश-विदेशात सांस्कृतिक कार्यक्रम: महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांसह देशातील १० राज्यांत आणि एका परदेशात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. नवी दिल्लीत ५ दिवस तर मुंबईत ८ दिवस विशेष कार्यक्रम होतील.
ऑनलाइन दर्शन व डिजिटल प्लॅटफॉर्म: प्रमुख गणेश मंदिरांच्या ऑनलाईन दर्शनासाठी स्वतंत्र पोर्टल तसेच घरगुती गणपतींच्या फोटोंसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाईल.
रील्स स्पर्धा व मराठी चित्रपटांचा गौरव: दादासाहेब फाळके चित्रनगरीतर्फे गणपतीविषयक 'रील्स स्पर्धा' आणि गणेशोत्सवाच्या परंपरा दाखवणाऱ्या मराठी चित्रपटांचा गौरव केला जाईल.
पर्यावरण संवर्धन, आरोग्य व इतर विशेष भर:
पर्यावरणपूरक उत्सव: शाडू मातीच्या मूर्ती, निर्माल्य संकलन, प्लास्टिकबंदी आणि कृत्रिम विसर्जन तलावांवर विशेष भर दिला जाईल.
युवक व शाळांसाठी कार्यशाळा: शाळांमध्ये शाडूच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण तर महाविद्यालयांमध्ये ‘गणेश आणि विज्ञान’ विषयावर परिसंवाद आणि रोबोटिक्स देखाव्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
आरोग्य व सर्वसमावेशकता: गर्दीच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आणि सीपीआर (CPR) प्रशिक्षण दिले जाईल. तसेच दिव्यांग भाविकांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आणि सांकेतिक भाषेतील आरतीची व्यवस्था केली जाईल.
प्रशासकीय नियोजन:
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र राज्य कला अकादमी या स्पर्धांचे समन्वय सामाळेल, तर सांस्कृतिक कार्य संचालनालय नोडल एजन्सी म्हणून काम करेल.