अक्षय काळे, (मुंबई) १९ ऑगस्ट - राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळवून देण्याचे निश्चित उद्दिष्ट शासनाने ठेवले असून, यासाठी आवश्यक ते परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) तसेच शिक्षणाधिकारी (योजना) यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
शाळा आणि संस्थांसाठी मुख्य सूचना:
कागदपत्रांची प्राथमिक छाननी: मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी प्रस्तावाची स्वतः प्राथमिक तपासणी करून सर्व माहिती, नोंदी आणि कागदपत्रे पूर्ण असल्याची खात्री करावी.
अपूर्ण प्रस्तावांमुळे विलंब टाळा: अपूर्ण किंवा त्रुटीपूर्ण प्रस्तावांमुळे प्रक्रियेला विलंब झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची राहील.
कालबद्ध अंमलबजावणी: प्राप्त प्रस्तावांची शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून तात्काळ तपासणी करून विहित कालावधीत पुढील कार्यवाही केली जाईल.
"अनुकंपा नियुक्तीचा लाभ हा कर्मचाऱ्यांच्या दुःखी कुटुंबांसाठी अत्यंत आधारवड ठरतो. त्यामुळे शासनाच्या या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र वारसांना वेळेत लाभ मिळवून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सर्व संस्था व मुख्याध्यापकांनी समन्वयाने काम करून तात्काळ प्रस्ताव सादर करावेत."
— कृष्णकुमार पाटील (शिक्षण संचालक, योजना)