आग्र्यात साकारणार छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक... दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांकडून जागेची पाहणी...

Share:
Main Image
Last updated: 19-Aug-2026

आग्रा, (प्रतिनिधी) १९ ऑगस्ट - छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथील नजरकैदेतून आपल्या असामान्य चातुर्य, धैर्य आणि संयमाच्या बळावर केलेली सुटका हा भारतीय इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी पराक्रम आहे. या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवून स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासाठी ‘शिवचातुर्य दिन’ आणि ‘गरुडझेप मोहीम’ हे उपक्रम प्रभावी माध्यम ठरत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक (आग्रा) समन्वयक जयकुमार रावल यांनी केले.

१,३१० किमीच्या 'गरुडझेप मोहिमेला' प्रारंभ

शिवचातुर्य दिनानिमित्त आग्रा किल्ला परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमात आग्रा ते राजगड या १,३१० किलोमीटरच्या ‘गरुडझेप मोहिमेला’ मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि रोजगार हमी योजना (रोहयो) मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्वतः या दौडीत धावत व सायकल चालवत सहभाग नोंदवून शिवभक्तांचा उत्साह वाढवला. गरुडझेप संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. मारुती गोळे यांच्या संकल्पनेतून गेल्या सात वर्षांपासून ही मोहीम आयोजित केली जात असून, आता या अभियानाने एका व्यापक जनचळवळीचे स्वरूप धारण केले आहे.

आग्रा येथे भव्य शिवस्मारकासाठी जागेची पाहणी

Advertisement

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक सहकार्य दर्शवले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आग्रा येथील 'कोठी मीना बाजार' परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. स्मारकाची प्रस्तावित जागा, विकासकामे आणि आराखड्याबाबत दोन्ही राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जागतिक कीर्तीच्या वास्तुविशारद आभा लांबा यांची या स्मारकाच्या वास्तुरचनेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

ऐतिहासिक स्थळांना मंत्र्यांची भेट

दौऱ्यादरम्यान मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा वास्तव्याशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. शिवरायांना नजरकैदेत ठेवण्यात आलेला मीना बाजार परिसर, त्यांच्या आग्रा प्रवासादरम्यानचा मुक्काम असलेले 'सेवला सराय' आणि त्यांनी दर्शन घेतलेल्या प्राचीन शिव मंदिराला मंत्र्यांनी भेट दिली.

यावेळी उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, आग्रा जिल्हाधिकारी मनीष बन्सल, आग्रा डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या एम. अरुंनमोझी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्यासह दोन्ही राज्यांतील अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet.